बँकॉक (थायलंड) : अंत्यसंस्काराचे नाव काढताच डोळ्यांसमोर शांत आणि शोकाकुल वातावरण उभे राहते. मात्र, थायलंडमध्ये एका कुटुंबाने आपल्या प्रिय व्यक्तीला निरोप देण्यासाठी चक्क डान्सर्सना पाचारण केले. मृत व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावर आता जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
थायलंडच्या नखोन सी थम्मरत प्रांतातील रॉन फिबुन जिल्ह्यातील एका मंदिरात हा अनोखा सोहळा पार पडला. येथे 59 वर्षीय एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, तिथे जमलेले लोक तेव्हा थक्क झाले, जेव्हा मृताच्या शवपेटीसमोर तीन कॉयोट डान्सर्सनी डान्स करण्यास सुरुवात केली.
बँकॉक पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, हा निर्णय केवळ मनोरंजनासाठी नव्हता, तर ती मृत व्यक्तीची शेवटची इच्छा होती. त्या व्यक्तीला वाटत होते की, त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आणि मित्रांनी दु:ख करू नये किंवा रडू नये. त्याऐवजी त्यांच्या आयुष्याचा प्रवास आनंद आणि हास्याने साजरा करावा, अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
आपल्या वडिलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या याच इच्छेचा आदर करत कुटुंबाने अंत्यसंस्काराच्या वेळी नृत्यांगनांना बोलावले. या अनोख्या विदाईचा व्हिडीओ इंटरनेटवर वार्यासारखा पसरला आहे. यावर नेटिझन्समध्ये दोन गट पडले आहेत. अनेकांनी या कुटुंबाचे कौतुक केले आहे. ‘एखाद्याच्या शेवटच्या इच्छेचा सन्मान करणे हीच खरी श्रद्धांजली आहे. मृत्यूला भीतीऐवजी उत्सवाप्रमाणे पाहणे ही सकारात्मक विचारसरणी आहे,’ अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत. दुसरीकडे ‘अंत्यसंस्कारासारख्या गंभीर आणि पवित्र प्रसंगी अशा प्रकारचे आयोजन करणे अयोग्य आहे,’ असे मत अनेक पारंपरिक विचारांच्या लोकांनी व्यक्त केले आहे.