विश्वसंचार

Allogrooming | मांजरांचे एकमेकांना चाटणे हे केवळ प्रेमाचे लक्षण नाही

संशोधनातून उघड झाली नवी सामाजिक कारणे

पुढारी वृत्तसेवा

लंडन : एकाच घरात एकापेक्षा जास्त मांजरे असतील, तर ती एकमेकांना चाटताना दिसणे ही एक सामान्य बाब आहे. विज्ञान जगतात या वर्तनाला ‘ॲलोग्रूमिंग’ (Allogrooming - एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला स्वच्छ करणे) असे म्हटले जाते. सहसा लोक याकडे मांजरांमधील मैत्रीचे किंवा प्रेमाचे लक्षण म्हणून पाहतात. परंतु, हे खरोखरच केवळ प्रेमापोटी असते का? की यामागे काही गूढ आणि गुंतागुंतीची कारणे दडलेली आहेत? ॲलोग्रूमिंगवर संशोधन अजूनही सुरूच आहे. परंतु, वैज्ञानिकांनी मांजरांच्या या वर्तनामागे काही सामाजिक तर काही व्यावहारिक कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे.

सुरुवातीच्या जुन्या सिद्धांतानुसार, मोकळ्या वातावरणात राहणाऱ्या मांजरांच्या टोळ्यांच्या निरीक्षणावरून असा निष्कर्ष काढला गेला होता की, हे वर्तन आपुलकी दाखवण्यासाठी आणि समूहात एकमेकांशी संबंध घट्ट करण्यासाठी असते. यामुळे संपूर्ण समूहाचा एकच विशिष्ट गंध तयार होण्यास मदत होते, असाही समज होता. मात्र, १९९८ मध्ये एकाच आवारात एकत्र राहणाऱ्या २५ मांजरांवर केलेल्या अभ्यासाने या जुन्या सिद्धांताला छेद दिला. या संशोधनात दिसून आले की, सुमारे ३५ टक्के ॲलोग्रूमिंगच्या प्रसंगांनंतर मांजरांमध्ये आक्रमकता पाहायला मिळाली. यावरून हे वर्तन केवळ मैत्रीपूर्ण नसून, बंदिस्त जागेत निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी आणि संभाव्य भांडण टाळण्यासाठी केलेला एक प्रयत्न असू शकते, असा प्रस्ताव संशोधकांनी मांडला.

या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बेल्जियममधील ‘घेंट विद्यापीठा’तील मांजर वर्तनशास्त्रज्ञ मॉर्गन व्हॅन बेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन मांजरे असलेल्या ५३ घरांचे व्हिडीओ विश्लेषण केले. त्यांच्या निष्कर्षानुसार, परिस्थितीनुसार ॲलोग्रूमिंगचे सामाजिक उद्देश वेगवेगळे असू शकतात. संशोधक पथकाच्या निदर्शनास आले की, जेव्हा मांजरे एकमेकांना बिलगून बसतात आणि एकमेकांसारख्याच शारीरिक स्थितीत असतात, तेव्हा चाटण्याची ही क्रिया त्यांच्यातील सामाजिक बंध मजबूत करण्याचे काम करते. या अभ्यासात बहुतांश वेळा मांजरे एकमेकांच्या कानांना चाटत असल्याचे आढळले.

मॉर्गन व्हॅन बेल यांच्या मते, कानाच्या त्वचेवर मोठ्या प्रमाणात संवेदनाक्षम चेतातंतू असतात, ज्यामुळे चाटल्याने मांजरांना आराम मिळतो आणि ताण कमी होतो. इतर प्राण्यांमध्येही ॲलोग्रूमिंगचे असेच सकारात्मक परिणाम दिसून येतात. उदाहरणार्थ, या क्रियेमुळे घोड्यांच्या हृदयाचे ठोके नियंत्रित होतात, तर माकडांमध्ये आनंद देणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढते. थोडक्यात सांगायचे तर, तुमच्या घरातील मांजरे एकमेकांना चाटत असतील, तर ती केवळ मैत्री जपण्यासाठी नव्हे, तर एकमेकांचा ताण कमी करण्यासाठी किंवा शांतता राखण्यासाठीही तसे करत असू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT