लंडन : कर्करोगाच्या मुळाशी जाऊन या आजाराला मुळापासून नष्ट करणारी औषधे विकसित करण्यासाठी जगभरात दररोज नवनवीन संशोधन केले जात आहे. या संदर्भात नुकताच एक नवा संशोधनात्मक अभ्यास समोर आला आहे. कर्करोगाच्या संशोधनासाठी आतापर्यंत केवळ उंदरांचा वापर केला जात होता; मात्र आता मांजरी देखील शास्त्रज्ञांच्या या संशोधनाचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. नव्या अभ्यासानुसार मांजरींमधील ट्यूमर आणि मानवी कर्करोग यांच्यात काही थक्क करणारी समानता आढळून आली आहे. ही माहिती मानवी कर्करोगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याच्या उपचारात मोठी मदत करू शकते.
मांजरींमधील कर्करोगाच्या जनुकीय अभ्यासादरम्यान मांजरींचे ट्यूमर आणि माणसांमधील कर्करोग यांच्यात अशा काही समान गोष्टी समोर आल्या आहेत, ज्याची शास्त्रज्ञांना मुळीच अपेक्षा नव्हती. या शोधामुळे मांजरींमधील कर्करोगावर अचूक उपचार करण्याचा मार्ग मोकळा तर होतोच, शिवाय माणसांमध्ये कर्करोग कसा पसरतो आणि औषधांवर तो कसा प्रतिसाद देतो, याविषयीही नवी माहिती मिळू शकते. हे संशोधन मांजरी आणि मानवांमध्ये कर्करोग का आणि कसा विकसित होतो, हे समजून घेण्यास मदत करेल. शास्त्रज्ञांनी या संशोधनाद्वारे अशा गोष्टींचे रहस्य उलगडले आहे, ज्याला संशोधक एकेकाळी जेनेटिक ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणायचे. ‘सायन्स डेली’ (ScienceDaily) च्या अहवालानुसार, या संशोधनामुळे मांजरींच्या कर्करोग उपचारात सुधारणा होईलच, शिवाय मानव आणि इतर प्राण्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे कर्करोग कसे निर्माण होतात, हे शास्त्रज्ञांना अधिक स्पष्टपणे समजेल. त्यामुळे कर्करोग उपचारात ही एक मोठी संधी मानली जात आहे.
मांजरींच्या मृत्यूचे कर्करोग हे प्रमुख कारण
मांजरी आजारी पडण्याचे आणि त्यांच्या मृत्यूचे कर्करोग हे एक मुख्य कारण आहे, ही बाब फार कमी लोकांना माहित आहे. तरीही मानव किंवा कुत्र्यांमधील कर्करोगाच्या तुलनेत मांजरींमधील ट्यूमरमागील जनुकीय बदलांची माहिती शास्त्रज्ञांकडे खूप कमी होती. ‘ग्वेल्फ युनिव्हर्सिटी’चे पॅथोबायोलॉजी प्रोफेसर आणि या संशोधनाचे सह-लेखक डॉ. जेफ्री वुड यांनी सांगितले की, ‘मांजर आणि मानवी कर्करोग संशोधनातील ही दरी आता मिटू लागली आहे.’