Cat Exposure Mental Illness Risk | मांजर पाळणाऱ्यांनो सावधान! ‘या’ मानसिक आजाराचा धोका  
विश्वसंचार

Cat Exposure Mental Illness Risk | मांजर पाळणाऱ्यांनो सावधान! ‘या’ मानसिक आजाराचा धोका

शास्त्रज्ञांनी दिला सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सिडनी : आजकाल लोकांमध्ये मांजर पाळण्याची क्रेझ खूप वाढली आहे. मांजर दिसायला गोंडस असते आणि ती आपल्या मालकावर खूप प्रेमही करते. परंतु, एका धक्कादायक संशोधनानुसार, घरात मांजर पाळणे तुमच्या आरोग्यासाठी, विशेषतः मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. संशोधकांच्या मते, मांजरीच्या संपर्कात आल्याने एका गंभीर मानसिक आजाराचा म्हणजेच 'सिझोफ्रेनिया' (Schizophrenia) चा धोका वाढू शकतो.

ऑस्ट्रेलियाच्या 'क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी'ने केलेल्या एका अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी हा हाय-अलर्ट जारी केला आहे. क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी गेल्या ४४ वर्षांत ११ देशांमध्ये झालेल्या १७ वेगवेगळ्या अभ्यासांचे सखोल विश्लेषण केले. या संशोधनात असे आढळून आले की, जे लोक मांजरीच्या सतत संपर्कात राहतात किंवा ज्यांच्या घरात मांजर असते, त्यांच्यामध्ये 'सिझोफ्रेनिया' हा मानसिक आजार होण्याचा धोका सामान्य माणसाच्या तुलनेत दुप्पट असतो. संशोधनानुसार, या मानसिक आजाराचा थेट संबंध मांजरीच्या विष्ठेमध्ये आढळणाऱ्या 'टॉक्सोप्लाझ्मा गोंडी' (Toxoplasma gondii) नावाच्या परजीवीशी (Parasite) आहे.

हा परजीवी मानवी मेंदूच्या आरोग्यावर थेट परिणाम करतो. यामुळे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर (डोपामिन) आणि इन्फ्लेमेशनवर (सूज) विपरीत परिणाम होतो. काही प्रकरणांमध्ये हा संसर्ग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत करू शकतो. 'सिझोफ्रेनिया' हा एक गंभीर मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि वागण्याची क्षमता बिघडते. हा आजार केवळ मांजरीमुळेच होतो असे नाही, तर अतिप्रचंड मानसिक ताण (Stress), आनुवंशिकता (Genetic) आणि मेंदूतील रासायनिक बदलांमुळे (Chemical Imbalance) देखील हा आजार होऊ शकतो.

मांजर पाळताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

जर तुम्ही घरात मांजर पाळली असेल किंवा पाळणार असाल, तर घाबरून न जाता पुढील खबरदारी घेणे आवश्यक आहे : मांजरीचा लिटर बॉक्स (विष्ठेची जागा) साफ केल्यानंतर तुमचे हात साबणाने अतिशय स्वच्छ धुवावेत. मांजरीच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या, जेणेकरून संसर्ग पसरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT