कार्बन मोनॉक्साईड विषबाधेवर लवकरच उतारा?  Pudhari File Photo
विश्वसंचार

कार्बन मोनॉक्साईड विषबाधेवर लवकरच उतारा?

जीवाणूपासून तयार केलेल्या प्रथिनाचा उंदरावरील प्रयोग यशस्वी

पुढारी वृत्तसेवा

लंडन : कार्बन मोनॉक्साईड या रंगहीन आणि गंधहीन वायूमुळे होणार्‍या विषबाधेवर लवकरच एक प्रभावी उपाय सापडण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी जीवाणूंपासून (बॅक्टेरिया) एक विशेष प्रथिने (प्रोटिन्स) तयार केली असून, उंदरांवरील प्रयोगात ती यशस्वी ठरली आहे. या उपचारामुळे उंदरांच्या शरीरातील कार्बन मोनॉक्साईड लघवीवाटे वेगाने बाहेर टाकण्यात आला.

काय आहे समस्या?

कार्बन मोनॉक्साईड विषबाधा ही जगभरातील एक मोठी समस्या आहे. आग, वाहनांचा धूर यांसारख्या स्रोतांमधून हा वायू बाहेर पडतो आणि रक्तातील हिमोग्लोबिनला घट्ट चिकटतो, ज्यामुळे शरीराचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होतो. डोकेदुखी, चक्कर येणे आणि गोंधळल्यासारखे होणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. सध्या यावर केवळ ऑक्सिजन थेरपी हाच उपचार आहे, पण तो वेळखाऊ असतो आणि अनेक रुग्णांना कायमस्वरूपी हृदय किंवा मेंदूचे आजार जडतात.

नव्या संशोधनातून आशेचा किरण

कार्बन मोनॉक्साईड विषबाधेवर उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी ‘पॅराबर्कहोल्डेरिया झेनोव्होरन्स’ नावाच्या जीवाणूंमधील ‘आरसीओम’ नामक प्रथिनावर लक्ष केंद्रित केले. हे प्रथिन कार्बन मोनॉक्साईडला घट्ट पकडते, पण ऑक्सिजनला नाही. शास्त्रज्ञांनी या प्रथिनामध्ये काही बदल करून त्याची कार्यक्षमता वाढवली. प्रयोगशाळेत, या प्रथिनाने एका मिनिटापेक्षा कमी वेळेत रक्तातील अर्धा कार्बन मोनॉक्साईड काढून टाकला.

संशोधकांचे ध्येय एक असे इंजेक्शन तयार करण्याचे आहे, जे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेतील कर्मचारी रुग्णाला त्वरित देऊ शकतील. हे औषध सुरक्षित असल्याने, विषबाधेची पूर्ण खात्री नसतानाही ते देणे शक्य होईल. मानवी चाचण्यांपूर्वी आता डुक्कर किंवा मोठ्या उंदरांसारख्या प्राण्यांवर याची चाचणी केली जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, कार्बन मोनॉक्साईड विषबाधेवर पहिल्यांदाच एक प्रभावी उतारा उपलब्ध होईल आणि जगभरातील हजारो लोकांचे प्राण वाचू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT