Cancer Research 
विश्वसंचार

Cancer Research : कॅन्सरच्या गाठी, मज्जासंस्था यांच्यात चालतो ‘संवाद’!

कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी शास्त्रज्ञांचे नवे संशोधन

पुढारी वृत्तसेवा

पोर्टलँड (अमेरिका) : शरीरात वाढणाऱ्या कर्करोगाच्या गाठी (ट्युमर) या केवळ निष्क्रिय पेशी नसून, त्या आपल्या मज्जासंस्थेशी (नर्व्हस सिस्टीम) थेट ‘संवाद’ साधतात, असे धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. या संवादामुळे मज्जासंस्थेत होणाऱ्या सूक्ष्म बदलांचा अभ्यास करून कर्करोगाचे निदान अत्यंत प्राथमिक टप्प्यातच करता येईल का, यावर अमेरिकेतील ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ सेबनेम एके एक्सी सखोल संशोधन करत आहेत.

शिकागो येथील इलिनॉय विद्यापीठात पीएच.डी. करत असताना एक्सी यांना एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली होती. सामान्यतः मानवी मेंदूत आढळणारी आणि स्मरणशक्तीशी संबंधित असलेली ‘न्यूरॉनल ॲडहेशन मॉलिक्यूल्स’ ही प्रथिने उच्च-जोखीम असलेल्या रुग्णांच्या प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आली. या शोधाने कर्करोग आणि मज्जासंस्था हे दोन स्वतंत्र विषय नसून ते एकमेकांशी अत्यंत जवळून जोडलेले असल्याचे समोर आले.

‘शरीरातील एखाद्या अवयवात गाठ वाढू लागली की, आपली मज्जासंस्था ती त्वरित ओळखते आणि ट्युमर तिच्याशी सक्रियपणे संवाद साधतात,’ असे एक्सी यांनी स्पष्ट केले. कर्करोग जसा वाढतो, तसा त्याचा परिणाम रुग्णाची झोप, आकलनशक्ती आणि वेदनांवर होत असतो. मात्र, रुग्णांच्या बायोप्सी नमुन्यांमध्ये हे सूक्ष्म मज्जातंतू (नर्व्ह फायबर्स) सहजपणे दिसून येत नाहीत. हा अडथळा दूर करण्यासाठी एकसी आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित इमेज रेकग्निशन अल्गोरिदमची चाचणी घेणार आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बायोप्सी नमुन्यांमधील मज्जातंतूंचा नकाशा तयार करून, कर्करोगाच्या प्रगतीनुसार मज्जासंस्थेत नेमके काय बदल होतात, याचा मागोवा घेतला जाईल. ‘कॅन्सर न्यूरोसायन्स’ या वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रातील हे संशोधन यशस्वी झाल्यास, कर्करोगाचे लवकर निदान करणे आणि रुग्णांचे जीवनमान अधिक सुसह्य करणे शक्य होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT