कॅनडाच्या किनारपट्टीला नर माशांनी दिली निळसर झालर! 
विश्वसंचार

Canada Coastline| कॅनडाच्या किनारपट्टीला नर माशांनी दिली निळसर झालर!

नासाने अंतराळातून टिपला विलोभनीय नजारा

पुढारी वृत्तसेवा

व्हँकुव्हर : कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील व्हँकुव्हर बेटाच्या किनारपट्टीवर समुद्राच्या पाण्यात पसरलेला निळसर-हिरव्या रंगाचा एक महाकाय पट्टा अंतराळातून टिपण्यात आला आहे. ‘नासा’च्या ‘लँडसॅट ९’ या उपग्रहाने टिपलेल्या विलोभनीय छायाचित्रामागे कोणतेही रासायनिक प्रदूषण किंवा शेवाळाची वाढ नसून, पॅसिफिक हेरिंग प्रजातीच्या माशांच्या सामूहिक प्रजननाची अद्‌भुत नैसर्गिक प्रक्रिया आहे.

दरवर्षी वसंत ऋतूच्या आगमनासोबत लाखो पॅसिफिक हेरिंग मासे प्रजननासाठी खोल समुद्रातून व्हँकुव्हर बेटाच्या उथळ किनारपट्टीकडे (विशेषतः बार्कले साउंड आणि सॅल्मन बीच परिसरात) स्थलांतर करतात. यावेळी मादी मासे समुद्री वनस्पतींवर (केल्प आणि ईलग्रास) कोट्यवधी अंडी घालतात, तर नर मासे या अंड्यांच्या फलनासाठी पाण्यात मोठ्या प्रमाणात शुक्राणूंचा (ज्याला शास्त्रीय भाषेत ‘मिल्ट’ - Milt म्हणतात) फवारा सोडतात. हा पांढरट-दुधाळ पदार्थ समुद्राच्या निळ्या पाण्यात मिसळल्यानंतर सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे पाण्याला चमकदार निळसर-हिरवा रंग प्राप्त होतो.

हा पट्टा इतका विशाल असतो की, तो शेकडो किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांच्या कॅमेऱ्यातही स्पष्टपणे कैद होतो. हेरिंग माशांच्या प्रजननाचा हा काळ संपूर्ण सागरी परिसंस्थेसाठी (इकोसिस्टिम) जीवनदायी ठरतो. या काळात किनारपट्टीवर सी लायन्स, सील, गरुड, लाखो सागरी पक्षी आणि हम्पबॅक व ग्रे व्हेल माशांची मोठी गर्दी होते. या सर्व जीवांसाठी हेरिंग मासे आणि त्यांची अंडी म्हणजे वर्षभरातील सर्वात मोठी मेजवानी असते. १९६० च्या दशकात अतिमासेमारीमुळे या माशांची संख्या धोक्यात आली होती. आता उपग्रह प्रतिमांच्या मदतीने या हिरव्या पट्ट्याचे क्षेत्रफळ मोजून, सागरी जीवशास्त्रज्ञांना हेरिंग माशांच्या संख्येचा आणि त्यांच्या पुनरुज्जीवनाचा अचूक अंदाज लावणे शक्य होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT