लंडन : नवीन संशोधनातून समोर आले आहे की, ‘व्हाइट ड्वार्फ’ म्हणजेच पांढरे बटू तारे आश्चर्यकारक रंगांच्या विविधतेमध्ये आढळतात. यात वैज्ञानिकांच्या मते, पहिल्यांदाच शोध लागलेला हिरवा तारा आणि आतापर्यंत शोधला गेलेला सर्वात लाल तारा यांचाही समावेश आहे.
‘RAS टेक्निक्स अँड इन्स्ट्रुमेंटस्’ या नियतकालिकात गुरुवारी (१५ ऑक्टोबर) प्रकाशित झालेल्या या नवीन अभ्यासानुसार, व्हाइट ड्वार्फ नावावरून जितके साधे वाटतात, प्रत्यक्षात ते त्यापेक्षा कितीतरी अधिक रंगांमध्ये आढळतात. कमी ते मध्यम वस्तुमान असलेला तारा आपला सर्व इंधन संपवल्यानंतर जो घनदाट आणि थंड होणारा गाभा उरतो, त्याला व्हाइट ड्वार्फ म्हणतात. सुरुवातीला शोधले गेलेले व्हाइट ड्वार्फ पांढऱ्या किंवा फिकट निळ्या रंगात चमकत असल्यामुळे त्यांना हे नाव मिळाले.
मात्र, नवीन संशोधनानुसार हे तारे गुलाबी, हिरवा, निळसर-हिरवा (cyan), जांभळा आणि पिवळा अशा विविध रंगांचा प्रकाश उत्सर्जित करतात. युनिव्हर्सिटी ऑफ वॅार्विकमधील खगोलशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक मार्क हॉलंडस् यांनी सांगितले की, बहुतेक तारे ‘परफेक्ट रेडिएटर्स’ (परिपूर्ण उष्णता उत्सर्जक) प्रमाणे वागतात, त्यामुळे त्यांचा रंग प्रामुख्याने तापमानावर ठरतो. मात्र, या अत्यंत घनदाट ताऱ्यांमध्ये कार्बन, कॅल्शियम आणि सोडियम यांसारखे सूक्ष्म घटक सभोवतालच्या दाट हेलियम प्लाझमाशी संवाद साधतात आणि सामान्य तापमानापेक्षा जास्त रंगांचा प्रकाश शोषून घेतात. यामुळे ताऱ्याचा रंग नेहमीच्या पांढऱ्या, निळ्या किंवा केशरी रंगापेक्षा वेगळा दिसतो.