Pet Communication AI | तुमचे पाळीव प्राणी आता माणसांसारखे बोलणार? 
विश्वसंचार

Pet Communication AI | तुमचे पाळीव प्राणी आता माणसांसारखे बोलणार?

चिनी स्टार्टअपचा अजब ‘एआय कॉलर’ बाजारात!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : जर तुमच्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल, तर तुम्ही कधी ना कधी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल. बर्‍याचदा त्यांचे भुंकणे किंवा ‘म्यु-म्यु’ करण्याचा नेमका अर्थ काय, हे समजून घेण्यात आपण अपयशी ठरतो. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या जगातून एक अत्यंत थक्क करणारी बातमी समोर आली आहे. चीनमधील एका स्टार्टअप कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांनी एक असा एआय कॉलर तयार केला आहे जो तुमच्या पाळीव प्राण्याचे म्हणणे थेट मानवी भाषेत अनुवादित करू शकतो.

‘मेंग शियाओयी’ नावाच्या या चिनी टेक स्टार्टअप कंपनीने हा अनोखा ‘पेट ट्रान्सलेटर’ सादर केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे डिव्हाईस पाळीव प्राण्याच्या गळ्यात पट्ट्यासारखे बांधले जाते. यामध्ये विशेष मायक्रोफोन्स आणि मोशन सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. हे सेन्सर्स प्राण्यांच्या आवाजासोबतच त्यांच्या शरीराच्या हालचाली आणि हावभावदेखील अचूकपणे टिपतात. हा डिव्हाईस अलिबाबा क्लाउडच्या ‘क्वेन एआया’ मॉडेलवर विकसित करण्यात आला आहे. या एआय सिस्टीमला लाखो प्राण्यांच्या आवाजांचे नमुने देऊन प्रशिक्षित करण्यात आले आहे. हे डिव्हाईस सुमारे 95 टक्के अचूकतेसह प्राण्यांच्या 20 पेक्षा जास्त भावना ओळखू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. हे एआय डिव्हाईस केवळ एका बाजूने काम करत नाही, तर याद्वारे तुम्हीदेखील तुमच्या पाळीव प्राण्याशी संवाद साधू शकता.

जेव्हा तुम्ही या डिव्हाईसमध्ये मानवी भाषेत काहीतरी बोलता, तेव्हा हा कॉलर त्या वाक्यांचे रूपांतर भुंकण्यात किंवा ‘म्यु-म्यु’ अशा आवाजात करून तुमच्या प्राण्याला ते समजावून सांगतो. या कॉलरचे वजन अवघे 27 ग्रॅम आहे. या कॉलरसोबत मालकाकडे एक छोटे वायरलेस डिव्हाईस असते, जे कॉलरशी जोडलेले राहते. कंपनीने जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, मांजराने ‘म्यु’ केल्यानंतर कॉलरमधून ‘मला खेळायचे आहे’ असा मानवी आवाज येतो. तसेच, कुत्र्याच्या भुंकण्यानंतर ‘मला भूक लागली आहे’ असा आवाज येतो. या अनोख्या कॉलरची अधिकृत विक्री बाजारात 30 मेपासून सुरू होणार आहे. याची सुरुवातीची किंमत 799 युआन (सुमारे 11 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लाँच होण्यापूर्वीच या कॉलरला 10 हजारांपेक्षा जास्त प्री-ऑर्डर (बुकिंग) मिळाल्या आहेत. असे असले तरी, सोशल मीडियावर लोक या दाव्याबाबत पूर्णपणे समाधानी दिसत नाहीत. ‘एक्स’ (द - पूर्वीचे ट्विटर) वर अनेक युजर्सनी या डिव्हाईसच्या 95 टक्के अचूकतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT