Human Intelligence Research | माणसाची प्रतिभा जैविकरित्या समजून घेता येणार? Pudhari File Photo
विश्वसंचार

Stereo-Seq V2' technology | माणसाची प्रतिभा जैविकरित्या समजून घेता येणार?

नवे ‘स्टीरियो-सीक व्ही2’ तंत्रज्ञान

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘स्टीरियो-सीक व्ही2’ नावाच्या एका नवीन तंत्रज्ञानामुळे शास्त्रज्ञ आता कोणाही व्यक्तीच्या मेंदूची अंतर्गत रचना अगदी पेशींच्या स्तरावर पाहू शकणार आहेत. या पद्धतीने जुन्या संरक्षित मेंदूच्या ऊतींची तपासणी करणे शक्य होणार असून, त्यामुळे ‘प्रतिभा’ जैविकरित्या समजू शकेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बीजीआय-रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केले असून, ते ‘सेल’ नावाच्या प्रतिष्ठित विज्ञान मासिकात प्रकाशित झाले आहे. या शोधातून वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या मेंदूत नेमके काय विशेष होते, हे शोधू शकतील. मेंदू रेणूंच्या स्तरावर कसे कार्य करतो हे समजून घेण्यासाठी आरएनए (रायबोन्यूक्लिक अ‍ॅसिड) अत्यंत महत्त्वाचे आहे. आरएनए रासायनिक प्रक्रिया सुलभ करते आणि जैविक सूचना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचवते. ‘स्टीरियो-सीक व्ही2’ नावाचे हे नवीन तंत्रज्ञान आरएनए मॅपिंग अधिक अचूक बनवते. यामुळे शास्त्रज्ञांना जीन अभिव्यक्ती अतिशय बारकाईने पाहता येईल.

या अभ्यासाचे सहलेखक डॉ. ली यंग यांनी सांगितले की, ‘जर आम्हाला आईनस्टाईनच्या संरक्षित मेंदूच्या ऊती मिळाल्या, तर आमची टीम नक्कीच या नवीन पद्धतीचा वापर करेल.’ यामुळे आईनस्टाईनच्या मेंदूत आरएनए कसे कार्य करत होते, ज्यामुळे त्यांची विचारशक्ती वाढली असावी, याचा शोध घेता येईल. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश दुर्मीळ रोग ओळखणे आणि त्यांच्या उपचारांमध्ये सुधारणा करणे हा आहे. मात्र, जुन्या संरक्षित नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता असल्यामुळे याचे उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात.

विशेषतः, खराब झालेल्या नमुन्यांमधून अचूक माहिती काढणे पूर्वी खूप कठीण होते. हे नवीन तंत्रज्ञान खूप जलद आणि प्रभावी असल्याने ते या समस्येवर मात करू शकते. 1955 मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे शवविच्छेदन करणार्‍या डॉ. थॉमस हार्वे यांनी त्यांचा मेंदू काढून स्वतःजवळ ठेवला होता. नंतर या मेंदूचे जवळपास 240 छोटे तुकडे करण्यात आले. काही तुकडे मायक्रोस्कोप स्लाईडवर लावून इतर संशोधकांना देण्यात आले, तर उर्वरित भाग बियर कूलरच्या आत मेसन जारमध्ये ठेवल्याचे सांगितले जाते. वैज्ञानिकद़ृष्ट्या एवढे महत्त्वाचे असूनही, अनेक दशके हा मेंदू आधुनिक संशोधनासाठी फारसा उपलब्ध झाला नाही. आईनस्टाईन यांच्या मृत्यूनंतर सुमारे 25 वर्षांनी एका पत्रकाराने तो पुन्हा शोधला, तेव्हापर्यंत नमुन्यांचा मोठा भाग एकतर वाटला गेला होता किंवा खराब झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT