वॉशिंग्टन : दीर्घकालीन अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळवीरांना अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये ‘सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण’ म्हणजेच गुरुत्वाकर्षणाचा अभाव हा त्यांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका मानला जातो. याचा थेट परिणाम दृष्टी, हाडे, स्नायू आणि शरीराच्या इतर अनेक अवयवांवर होतो. या समस्येवर कृत्रिम गुरुत्वाकर्षण हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. स्टॅन्ली कुब्रिक यांच्या १९६८ मधील '२००१: अ स्पेस ऑडिसी' या प्रसिद्ध चित्रपटात दाखवल्याप्रमाणे अंतराळ जहाजावर फिरणाऱ्या एका मोठ्या चक्राच्या साहाय्याने पृथ्वीसारखे बल निर्माण केले जाऊ शकते.
युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर येथील एरोस्पेस इंजिनिअरिंगचे सह-प्राध्यापक टोरिन क्लार्क यांनी सांगितले, 'हे शक्य न होण्याचे कोणतेही कारण नाही. तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, अगदी नजीकच्या भविष्यात ही गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकते.' वास्तविक, अंतराळात कृत्रिम गुरुत्वाकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न याआधीही झाला होता. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) ८.२ फूट (२.५ मीटर) रुंदीचे ‘सेंट्रीफ्यूज अकोमोडेशन मॉड्यूल’ तयार करण्याचे नियोजन होते, परंतु २००५ मध्ये बजेटअभावी हा प्रकल्प रद्द करण्यात आला. टेक्सास A&M युनिव्हर्सिटीच्या एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या सह-प्राध्यापिका अॅना डायझ आर्टिलीस म्हणाल्या, 'कृत्रिम गुरुत्वाकर्षण हा असा विषय आहे, जो अचानक खूप प्रसिद्ध होतो.
नासा आणि इतर सर्व शास्त्रज्ञांना याचे प्रत्यक्ष नियोजन करण्यासाठी मोठा निधी मिळतो आणि नंतर अचानक हा विषय बासनात गुंडाळला जातो. पुन्हा काही काळाने हा विषय समोर येतो आणि मागे पडतो. माझ्या कारकिर्दीत मी असे अनेक टप्पे पाहिले आहेत.' आर्थिक बजेटव्यतिरिक्त, या उपायाची अंमलबजावणी कशी करावी याबद्दल अनेक प्रश्न आहेत. 'कृत्रिम गुरुत्वाकर्षण ही एक चांगली कल्पना आहे, यावर सर्वांचे एकमत आहे, पण मुख्य अडचण म्हणजे याची अंमलबजावणी कशी करायची हे अजून स्पष्ट नाही,' असे डायझ आर्टिलीस यांनी स्पष्ट केले. 'अशा उपकरणासाठी आपल्याला किती प्रमाणात गुरुत्वाकर्षण हवे आहे? त्या उपकरणाचा आकार किती मोठा असावा? ते किती काळ वापरले पाहिजे? आपण सतत गुरुत्वाकर्षण चालू ठेवावे की कमी त्रिज्येचे सेंट्रीफ्यूज वापरून अंतराळवीरांनी ठराविक वेळेसाठीच त्याचा वापर करावा?'
संशोधकांकडे कृत्रिम गुरुत्वाकर्षण निर्माण करण्याचे मुख्य तीन मार्ग आहेत. त्यातील पहिला म्हणजे विज्ञानकथांमध्ये दाखवली जाणारी कल्पना : एक विशाल फिरणारे चक्र. यामध्ये प्रवाशांचे राहण्याचे ठिकाण फिरवले जाते, ज्यामुळे त्यांना पृथ्वीसारख्या गुरुत्वाकर्षणाचा अनुभव मिळतो. 'या पद्धतीमध्ये त्रिज्या मोठी असते, ज्यामुळे गुरुत्वाकर्षण निर्माण करण्यासाठी चक्र खूप वेगाने फिरवावे लागत नाही,' असे डायझ आर्टिलीस म्हणाल्या. 'परंतु ही रचना प्रचंड मोठी असते. एकाच अंतराळ जहाजातून तिचे सर्व भाग अंतराळात नेणे शक्य नाही, त्यासाठी अनेक मोहिमा आणि अंतराळातच जोडणी करावी लागेल. त्यामुळे हा किती मोठा आणि कठीण प्रकल्प आहे, याची कल्पना केली जाऊ शकते.'