लंडन : आपले नातेवाईक असलेल्या ऑक्टोपसप्रमाणेच ‘कॅटलफिश’ देखील रुपांतर करण्यात अत्यंत निष्णात मानले जातात. शिकार करताना हे सागरी शिकारी आपल्या त्वचेवर विविध रंगांच्या लाटा निर्माण करतात. हा रंगीबेरंगी प्रयोग पाहून त्यांची शिकार एका जागी थबकते. तेवढ्यात ही संधी साधून कटलफिश विजेच्या वेगाने आपल्या दोन विशेष शिकारी सोंडी (टेन्टॅकल्स) बाहेर काढतात आणि भक्ष्याला आपल्या तीक्ष्ण जबड्यात पकडतात.
पण कटलफिश खरोखरच आपल्या रंग बदलण्याच्या या क्षमतेने शिकारीला ‘मोहित’ किंवा ‘हिप्नोटाईज’ (सम्मोहित) करू शकतात का? की यामागे काही वेगळेच गणित आहे? शास्त्रज्ञांच्या मते, कटलफिश हे अत्यंत हुशार शिकारी आहेत; परंतु समुद्राच्या तळाशी घडणारी ही प्रक्रिया केवळ हिप्नोटिझम नसून त्याहून अधिक गूढ आणि रंजक आहे. कटलफिश हे प्रामुख्याने नजरेच्या आधारे शिकार करतात. आपल्या मोठ्या आणि विकसित डोळ्यांच्या मदतीने ते संभाव्य शिकारीचा शोध घेतात आणि त्याचा माग काढतात.
मॅसॅच्युसेट्स येथील ‘मरीन बायोलॉजिकल लॅबोरेटरी’चे सेफॅलोपॉड ऑपरेशन्स मॅनेजर ब्रेट ग्रास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘कॅटलफिश अत्यंत हळूवार आणि शांतपणे शिकारीजवळ जातात, जेणेकरून कोळंबी (Shrimp), मासे किंवा खेकड्यांना त्यांच्या येण्याची चाहूलही लागत नाही.’’ शिकारीच्या जवळ जात असताना कटलफिश अनेकदा आपल्या शरीरावर रंगीबेरंगी पट्ट्यांची हालचाल दर्शवणारा एक प्रयोग सादर करतात. त्यांच्या त्वचेतील प्रकाश परावर्तित करणाऱ्या विशिष्ट पेशींमुळे (iridophores, leucophores आणि chromatophores) हे घडून येते.
अवघ्या काही मिलिसेकंदांत या पेशींचे आकुंचन आणि प्रसरण होऊन विशिष्ट रंग आणि नक्षी तयार होते. हा खेळ पाहून शिकार मोहित (hypnotize) होते का, असा प्रश्न पडू शकतो; परंतु शास्त्रज्ञांच्या मते तसे नाही. हिप्नोटिझम किंवा संमोहन ही मानवाशी संबंधित एक मानसिक स्थिती मानली जाते, ज्यामध्ये मन अत्यंत शांत आणि विशिष्ट मानसिक अवस्थेत जाते. प्राण्यांमध्ये किंवा माशांमध्ये अशा प्रकारचे संमोहन होऊ शकते का, यावर फार कमी संशोधन झाले आहे. २००५ च्या एका अभ्यासात असे दिसून आले होते की, ‘स्नॅपर’ माशांवर पाण्याचा प्रवाह सोडल्यास ते संमोहित झाल्यासारखे स्थिर होतात.
तसेच २०१३ च्या एका अभ्यासात ‘झेब्राफिश’वर संमोहक औषधांचा प्रभाव अभ्यासला गेला होता. परंतु, केवळ दृश्यांच्या माध्यमातून माशांना संमोहित केले जाऊ शकते का, यावर अद्याप थेट संशोधन झालेले नाही. काही प्राणी (उदा. कोंबड्या) अत्यंत भीतीपोटी किंवा धक्क्यामुळे काही काळासाठी अचानक स्तब्ध होतात (Tonic Immobility). परंतु, कोलंबिया युनिव्हर्सिटीचे सेफॅलोपॉड फॅसिलिटी मॅनेजर कॉनॉर गिबन्स यांच्या मते, कटलफिशचा हा रंगांचा खेळ त्यांच्या शिकारीला ‘हिप्नोटाईज’ करत असावा हे शक्य वाटत नाही. त्याऐवजी, अनेक संशोधकांच्या मते ही रंगांची नक्षी म्हणजे शिकारीला भ्रमित करण्यासाठी आणि स्वतःचा बचाव किंवा वेषांतर करण्यासाठी कटलफिशने वापरलेली एक अत्यंत हुशार युक्ती (Ingenious Disguise) आहे.