प्राणी इतर प्रजातींची भाषा शिकू शकतात? 
विश्वसंचार

प्राणी इतर प्रजातींची भाषा शिकू शकतात?

animal communication : पक्षी इतर प्रजातींचे संकेत समजून घेण्यात आघाडीवर

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः दरवर्षी, प्राण्यांच्या संवादाच्या पद्धतींबाबत अधिकाधिक माहिती मिळत आहे. संशोधनातून असे आढळले आहे की, हत्ती कान हलवून आणि गंभीर आवाज काढून एकमेकांना अभिवादन करतात, स्पर्म व्हेल्सच्या क्लिकिंग आवाजांमध्ये संभाषणाच्या संदर्भानुसार बदल होतो आणि नेकेड मोल रॅटस् हे उंदीर त्यांच्या वसाहतींसाठी विशिष्ट ‘अ‍ॅक्सेंटस्’ वापरतात. इतक्या वेगवेगळ्या संवाद पद्धती असताना, एक प्राणी दुसर्‍या प्राण्याची ‘भाषा’ शिकू शकतो का? हा मोठा प्रश्न आहे. संशोधनावर नजर टाकल्यास असे दिसून येते की काही प्राणी इतर प्राण्यांचे संकेत समजू शकतातच, शिवाय ते वापरूही शकतात!

तथापि, शास्त्रज्ञांच्या मते, मानवासारखी भाषा प्राण्यांमध्ये नसते. झुरिच विद्यापीठातील उत्क्रांती मानवशास्त्राचे प्राध्यापक साईमन डब्ल्यू. टाऊनसेंड यांच्या मते, ‘भाषा ही माणसांसाठी विशिष्ट संप्रेषण पद्धती आहे.’ त्यामुळे, प्राण्यांच्या संवादाचा अभ्यास करताना, विशिष्ट आवाजाचे विशिष्ट अर्थ असतात का, याकडे लक्ष दिले जाते. संशोधनानुसार, पक्षी हे इतर प्रजातींचे संकेत समजून घेण्यात आघाडीवर आहेत. गाणार्‍या पक्ष्यांच्या स्थलांतराच्या अभ्यासात, वेगवेगळ्या प्रजाती एकमेकींच्या कॉल्स समजून घेत असल्याचे आढळले. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयच्या बेंजामिन व्हॅन डोरेन यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे दिसून आले की, स्थलांतर करणारे पक्षी एकमेकांचे आवाज समजून घेत असावेत, ज्यामुळे त्यांना प्रवासात मदत मिळू शकते. हा शोध, स्थलांतर करणारे पक्षी एकटेच प्रवास करतात या पूर्वीच्या संकल्पनेला छेद देतो. परंतु, केवळ समजून घेणे पुरेसे नाही ः भाषा शिकणे म्हणजे ती वापरणेही महत्त्वाचे असते आणि येथेच ‘फोर्क-टेल्ड ड्रोंगो‘ पक्षी अत्यंत कौशल्यवान आहे. हा आफि— कन पक्षी इतर प्राण्यांचे कॉल केवळ समजत नाही, तर तो त्यांची नक्कलही करतो! हा पक्षी मीरकॅटसारख्या इतर प्राण्यांचे इशारे हुबेहूब नकलून त्यांना फसवतो, ज्यामुळे ते अन्न टाकून पळून जातात आणि ड्रोंगो त्यांचे अन्न चोरतो!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT