विश्वसंचार

चक्क केक आणि क्रीमचा वधू पोशाख!

Arun Patil

लंडन : जगभरात अनेक प्रकारचे विश्वविक्रम होत असतात. त्यांची नोंद गिनिज बुकमध्ये होत असते. काही विक्रम तर थक्क करणारेच असतात. असाच एक अनोखा विक्रम आहे वधू पोशाखाबाबतचा. हा वेडिंग ड्रेस चक्क केक आणि क्रीमच्या सहाय्याने बनवण्यात आला होता!

स्वित्झर्लंडमधील नताशा कोलाईन किम फाह ली फोकस असे लांबलचक नाव असलेल्या महिलेने स्विस वर्ल्ड वेडिंग फेअरमध्ये हा विश्वविक्रम केला. हा सुंदर पांढराशुभ्र पोशाख चक्क केक व क्रीमचा आहे, असे म्हटल्यावर अनेकांचे डोळे विस्फारले. या वेडिंग गाऊन ड्रेसचा घेर 4.15 मीटर, उंची 1.57 मीटर आहे. या ड्रेसच्या स्कर्टला आधार म्हणून आत अल्युमिनियमची पातळसर फ्रेम लावलेली आहे. हा केक एकाच जागी स्थिर राहून तो जागचा हलू नये यासाठी त्यामध्ये विशेष बोर्ड आहे.

केकचा ड्रेस परिधान करणार्‍या मॉडेलला तो सहज घालून चालता यावे यासाठी ड्रेसच्या खालील बाजूस चक्क चाकेही लावलेली आहेत. ड्रेसचा वरील भाग हा साखरेच्या पेस्टपासून बनवलेला आहे. 'स्वीटी केक्स'ची संस्थापक असलेल्या नताशाला लग्नाचा केक बनवत असताना अशा पोशाखाची कल्पना सुचली. अनेक प्रयत्नांमध्ये आपण कुठे चुकत आहोत हे तिला समजत गेले व अखेर हा केकचा ड्रेस तयार झाला.

SCROLL FOR NEXT