Bus to train transformation: बसचे चक्क ट्रेनमध्ये रूपांतर! Pudhari
विश्वसंचार

Bus to train transformation: बसचे चक्क ट्रेनमध्ये रूपांतर!

जपानच्या कायो शहरात ‌‘ड्युएल-मोड व्हीकल‌’ (DMV) नावाचे हे अनोखे वाहन सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : कल्पना करा की, एक अशी ट्रेन जी तुमच्या घरासमोरून तुम्हाला पिकअप करेल, रस्त्यावरून धावत जवळच्या रेल्वे स्टेशनवर जाईल आणि तिथे अवघ्या काही सेकंदात स्वतःला ट्रेनमध्ये बदलून रुळांवरून धावू लागेल. हे एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखे वाटत असले, तरी जपानने हे प्रत्यक्षात उतरवले आहे. जपानच्या कायो शहरात ‌‘ड्युएल-मोड व्हीकल‌’ (DMV) नावाचे हे अनोखे वाहन सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे वाहन दिसायला एखाद्या मिनी बससारखे आहे. यात रबरचे टायर आणि स्टीलची चाके अशा दोन्ही व्यवस्था आहेत. जेव्हा हे वाहन रस्त्यावरून धावते, तेव्हा ते सामान्य बसप्रमाणे रबरच्या टायर्सचा वापर करते. रुळांवर येताच, यातील स्टीलची चाके खाली येतात आणि रबरचे टायर वर उचलले जातात. यामुळे ही बस एका हाय-स्पीड ट्रेनमध्ये रूपांतरित होते. या वाहनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, बसमधून ट्रेनमध्ये बदलण्यासाठी याला केवळ 15 सेकंद लागतात. एका बटणाच्या क्लिकवर याची चाके बदलली जातात. या ड्युएल-मोड वाहनाचा वेगही थक्क करणारा आहे.

रस्त्यावरील वेग 60 कि.मी. प्रतितास असून, रुळावरील वेग ताशी 100 कि.मी.पेक्षा जास्त आहे. यात एकावेळी 21 ते 23 प्रवासी बसून प्रवास करू शकतात. हे वाहन डिझेल इंजिनवर चालते. हे वाहन ‌‘आसा कोस्ट रेल्वे‌’ या सार्वजनिक कंपनीच्या मालकीचे आहे. डिसेंबर 2021 पासून हे वाहन जपानच्या ‌‘शिकोकू‌’ बेटावरील कोची आणि तोकुशिमा प्रांतांदरम्यान धावत आहे. रस्त्यावरून आणि रुळांवरूनही धावण्याच्या क्षमतेमुळे, डोंगराळ आणि दुर्गम भागातील प्रवास आता अत्यंत सोपा आणि सुखकर झाला आहे. पर्यटकांना यातून निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT