विश्वसंचार

‘पत्त्यांचा बंगला’ गिनिज बुकमध्ये!

Arun Patil

कोलकाता : खेळातील पत्त्यांनी एखादा विश्वविक्रम करता येऊ शकतो का, असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर कदाचित नकारार्थी येऊ शकेल. पण कोलकात्यातील 15 वर्षांच्या अर्णव डागा या मुलाने असाच भीमपराक्रम करून दाखवला आहे. अर्णवने छोट्या छोट्या पत्त्यांच्या सहाय्याने जगातील सर्वात मोठे प्लेईंग स्ट्रक्चर तयार केले आणि त्याची आता गिनिज बुकात नोंद झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने यासाठी डिंकाचा किंवा अन्य कोणत्याही घटकाचा वापर केलेला नाही. अर्णवने कमालीची दक्षता पाळत हे प्लेईंग स्ट्रक्चर तयार केले. या स्ट्रक्चरमध्ये ऐतिहासिक इमारती, सॉल्ट लेक स्टेडियम, सेंट पॉल कॅथेड्रलचा समावेश आहे.

अर्णवला चार प्रतिष्ठेच्या इमारतींचे स्ट्रक्चर उभे करण्यासाठी थोडेथोडके नव्हे तर चक्क 41 दिवस खर्ची घालावे लागले. या पूर्ण स्ट्रक्चरसाठी त्याने एकूण 1 लाख 43 हजार पत्त्यांचा वापर केला. या स्ट्रक्चरची लांबी 40 फूट व रुंदी 11 फूट 7 इंच इतकी आहे. अर्णवने यावेळी ब्रायन बर्गचा मागील विक्रम मोडीत काढला आहे.

या स्ट्रक्चरबद्दल बोलताना अर्णव म्हणाला, 'वास्तविक, हे स्ट्रक्चर साकारणे खूपच आव्हानात्मक होते. त्यासाठी मी वास्तुकलेचा अभ्यास केला. त्यातील सूक्ष्म बाबी समजून घेतल्या. ज्या ठिकाणच्या इमारती साकारणार होतो, तेथे प्रत्यक्ष भेट देऊन त्याची पाहणी केली. त्यानंतर हे स्ट्रक्चर उभे करणे शक्य झाले'.

SCROLL FOR NEXT