World’s Narrowest Building | भावाचा सूड उगवण्यासाठी बांधली जगातील सर्वात अरुंद इमारत 
विश्वसंचार

World’s Narrowest Building | भावाचा सूड उगवण्यासाठी बांधली जगातील सर्वात अरुंद इमारत

लेबनॉनमधील ‘द ग्रज’ची रंजक कहाणी

पुढारी वृत्तसेवा

बैेरूत : भावाभावांमधील संपत्तीचे वाद नवीन नाहीत; मात्र लेबनानची राजधानी बैेरूत येथे दोन भावांतील वादातून स्थापत्यशास्त्राचा असा एक अजब नमुना तयार झाला आहे, त्‍याला पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित होते. केवळ भावाचा सूड उगवण्यासाठी बांधण्यात आलेली ही इमारत जगातील सर्वात अरुंद इमारत मानली जाते. स्थानिक लोक या इमारतीला ‘द ग्रज’ किंवा अरबी भाषेत ‘अल-बअसा’ म्हणतात, याचा अर्थ ‘सूड’ असा होतो. बाहेरून एखाद्या आलिशान इमारतीसारखी दिसणारी ही वास्तू आतून मात्र इतकी अरुंद आहे की तिच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणेही कठीण होते.

सुडाची रंजक कहाणी आणि वैशिष्ट्ये

१९५४ मधील संपत्तीचा वादातून या इमारतीची रंजक कहाणी सुरू होते. वडिलांच्या संपत्तीच्या वाटणीत एका भावाला समुद्रकिनाऱ्यालगतचा मोठा आणि किमती भूखंड मिळाला, तर दुसऱ्या भावाच्या वाट्याला १२० वर्गमीटरचा अत्यंत लहान आणि विचित्र आकाराचा तुकडा आला. लहान भावाने संतापाच्या भरात आपल्या भूखंडावर १४ मीटर उंच आणि अत्यंत अरुंद भिंतीसारखी इमारत उभी केली. याचा एकमेव उद्देश मोठ्या भावाच्या जागेवरून दिसणारे समुद्राचे सुंदर दृश्य पूर्णपणे बंद करणे हा होता, जेणेकरून त्याच्या भावाच्या जमिनीची किंमत कमी व्हावी.

इमारतीचा आकार

ही इमारत सर्वात कमी रुंदी असलेल्या ठिकाणी केवळ ६० सेंटिमीटर (२ फूट) आणि सर्वात जास्त रुंदीच्या ठिकाणी ४ मीटर खोल आहे. प्रत्येक मजल्यावर दोन अपार्टमेंटस् असून, एक गॅलरी खोल्यांना जोडते. जशी इमारत बारीक होत जाते, तसा खोलीचा आकार कमी होत जातो आणि शेवटी एक अत्यंत लहान कोपरा उरतो. बैरूतच्या सध्याच्या बांधकाम नियमांनुसार हा भूखंड खूप लहान असल्याने ही इमारत पाडल्यास तेथे नवीन बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे ही इमारत पाडण्याऐवजी मालक ती भाड्याने देतात. एकेकाळी सूड उगवण्यासाठी बांधलेली ही इमारत आज बैरूत शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT