लंडन : नशिबाची साथ असेल तर कुणीही कधीही रंकाचा राव बनू शकतो, तसेच नशीब रुसलं तर रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. असाच अनुभव ब्रिटनमधील एका दाम्पत्याला आला आहे. घराच्या किचनमध्ये खोदकाम करताना या दाम्पत्याला पुरातन खजिना सापडला. सापडलेल्या मौल्यवान वस्तूंमध्ये 17 व्या शतकातील जवळपास 100 दुर्मीळ नाण्यांचा समावेश आहे. ही नाणी इंग्लंडमधील गृहयुद्धाच्या काळातली आहेत. नुकत्याच झालेल्या एका लिलावात ही नाणी सुमारे 75 हजार डॉलर्सला (सुमारे 65 लाख रुपये) विकली गेली. रॉबर्ट फूक्स आणि बेट्टी फूक्स असं या दाम्पत्याचं नाव असून, ते एका क्षणात लखपती झाले. ही घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या वेस्ट डॉर्सेटमध्ये राहत असलेल्या एका दाम्पत्याला हा मौल्यवान खजिना सापडला आहे. दाम्पत्याने आपल्या फार्म हाऊसच्या नूतनीकरणाचं काम सुरू केलं होतं. घराच्या किचनमध्ये खोदकाम करताना त्यांना हा पुरातन खजिना सापडला. रॉबर्ट फूक्स हे त्यांची पत्नी बेट्टी फूक्सच्या मदतीने घरात खोदकाम करत होते. त्यांच्या कुदळीचा वार एका मातीच्या भांड्याला लागला. भांडं फुटलं आणि त्यातून इंग्लंडमधील गृहयुद्धाच्या काळातली 100 नाणी बाहेर आली.
पुटन कॉईन होर्ड म्हणून ओळखल्या जाणार्या या संग्रहात जेम्स पहिले आणि चार्ल्स पहिले यांच्या काळातील सोन्याची नाणी होती. याशिवाय, एलिझाबेथ पहिली, फिलिप आणि मेरी यांच्या काळातील चांदीचे ‘हाफ क्राऊन’, ‘शिलिंग’ आणि ‘सिक्स पेन्स’ नाण्यांचा यात समावेश होता. त्यांनी ती सर्व नाणी एका बादलीत भरली. या जोडप्याने ही नाणी ब्रिटिश म्युझियममध्ये तपासणीसाठी पाठवली. ही सर्व नाणी 1642 ते 1644 दरम्यान इंग्लंडमधील गृहयुद्धाच्या गोंधळात लपवून ठेवली असावीत, अशी माहिती तिथल्या तज्ज्ञांनी त्यांना दिली. त्यावेळी सैनिक लोकांच्या घरात घुसून जेवण मागायचे आणि कधीकधी मौल्यवान वस्तू चोरून नेत असत. त्यामुळे ती नाणी सुरक्षित राहावीत, म्हणून लपवून ठेवली असावीत, असंही त्यांनी सांगितलं होतं.