Blue Jellyfish | अचानक ‘निळ्या जेलीफिश’ने भरून गेला ब्रिटनमधील समुद्रकिनारा!  
विश्वसंचार

Blue Jellyfish | अचानक ‘निळ्या जेलीफिश’ने भरून गेला ब्रिटनमधील समुद्रकिनारा!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या लोकांना ब्रिटनमध्ये यंदा असा एक नजारा पाहायला मिळाला, ज्याने सर्वांनाच अवाक्‌ केले. वाळूवर विखुरलेल्या चमकदार निळ्या रंगाच्या लहान-लहान जीवांना पाहून अनेकांना वाटले की, समुद्रातून एखादी रहस्यमयी गोष्ट बाहेर आली आहे. ब्रिटनमधील कुम्ब्रिया येथील ‘सेंट बीझ बीच’वर मोठ्या संख्येने हे निळे जीव वाहून आले आहेत. त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेले पर्यटक थबकले आणि आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करू लागले. सोशल मीडियावरही या निळ्या जीवांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. दिसायला हे जेलीफिशसारखे वाटत असले, तरी सागरी तज्ज्ञांच्या मते हे ‘खरे जेलीफिश’ नाहीत. त्यांचे वैज्ञानिक नाव ‘वेलेला वेलेला’ (Velella velella) असे असून, त्यांना सामान्य भाषेत ‘बाय-द-विंड सेलर्स’ म्हटले जाते. त्यांना स्पर्श करणेही धोकादायक असते.

सागरी तज्ज्ञांनुसार, वाहणारे जोरदार पश्चिमी वारे आणि उष्ण हवामानामुळे हे जीव मोठ्या संख्येने समुद्राच्या पृष्ठभागावरून वाहून किनाऱ्यावर आले आहेत. ‘वेलेला वेलेला’ हे समुद्राच्या पाण्याचे वरच्या थरावर तरंगणारे लहान जीव असतात. त्यांच्या पाठीवर एका छोट्या पारदर्शक शिडासारखी रचना असते, ज्याच्या मदतीने ते वाऱ्याच्या दिशेने समुद्रात पुढे सरकतात. जेव्हा वाऱ्याची दिशा बदलते किंवा वेग वाढतो, तेव्हा हे जीव हजारोंच्या संख्येने समुद्रातून किनाऱ्याकडे फेकले जातात. ब्रिटनमध्ये घडलेली ही घटना गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक मानली जात आहे. याआधी वेल्सच्या किनारपट्टीवरही असे जीव मोठ्या प्रमाणात आढळले होते. सेंट बीझ बीचवर आलेल्या पर्यटकांनी सांगितले की, वाळूवर पसरलेले हे निळे जीव दिसायला अत्यंत सुंदर वाटत होते. लुईस निकोलसन या पर्यटकाने सांगितले की, किनाऱ्यावर शेकडोंच्या संख्येने हे जीव पडलेले होते.

ते अवघे ५ सेंटीमीटर (सुमारे २ इंच) लांब असून, त्यांचा रंग इतका चमकदार निळा आहे की, ते लांबूनच लक्ष वेधून घेतात. परंतु, तज्ज्ञांनी लोकांना या जीवांना स्पर्श न करण्याचा सल्ला दिला आहे. जरी यांचे विष मानवासाठी प्राणघातक नसले, तरी त्यांना हात लावल्यानंतर त्वचेला खाज किंवा जळजळ होऊ शकते. विशेषतः, त्यांना हात लावल्यानंतर जर तोच हात चेहऱ्याला, डोळ्यांना किंवा ओठांना लागला तर त्रास वाढू शकतो. सागरी तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, ‘वेलेला वेलेला’ हा एकटा स्वतंत्र प्राणी किंवा जेलीफिश नसून ती लहान सूक्ष्म जीवांची एकत्र आलेली एक ‘कॉलोनी’ (समुच्चय) असते, जी एका जीवाप्रमाणे काम करते. यांच्या शरीराच्या खाली लहान-लहान सुतासारखे भाग (टेंटेकल्स) असतात, ज्याच्या मदतीने ते पाण्यातील सूक्ष्म जीव आणि प्लँक्टन खाऊन जगतात. हे जीव अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात आढळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT