विश्वसंचार

खतरनाक पिर्‍हानाचा नाश्ता करणारा मासा!

Arun Patil

न्यूयॉर्क : पिर्‍हाना मासा छोट्या आकाराचा असला तरी त्याचे दात अत्यंत तीक्ष्ण असल्याने त्याच्या वाटेला कुणी जात नाही; मात्र अशा खतरनाक माशाचीही नाश्त्यासाठी शिकार करणारा गोड्या पाण्यातील एक मासा आहे. बोलिव्हियन अमेझॉनमधील या माशाला स्थानिक भाषेत 'पैची' किंवा 'अरापैमा गिगा' म्हटले जाते. हा गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा आहे.

हा मासा 4 मीटर लांबीचा असतो आणि त्याचे वजन तब्बल 200 किलो असते. अमेझॉन नदीत असे मासे आढळतात. बोलिव्हियामध्ये हा मासा सर्वात प्रथम कधी आढळला याची नोंद नाही. पेरूमधील पैची फिश फार्ममधून हे मासे याठिकाणी आले असावेत असे काहींना वाटते. पेरू हा देश या माशांचे मूळ ठिकाण आहे. तेथून त्यांचा बोलिव्हियाच्या नद्यांमध्ये फैलाव झाला.

हे मासे सुरुवातीच्या काळात दरवर्षी दहा किलोने वाढत असतात. याचा अर्थ ते अनेक मासे खातात. त्यामध्येच पिर्‍हानासारख्या धोकादायक माशांचाही समावेश असतो. याशिवाय जलवनस्पती, पक्षी आणि शैवालही हे मासे खातात. एखाद्या मोठ्या व्हॅक्युम क्लीनरप्रमाणे ते आपले भक्ष्य ओढून घेऊन गट्टम करतात! त्यांची पिल्ली खाण्यासाठी आलेल्या अन्य माशांना त्यांची दहशत असते.

SCROLL FOR NEXT