Bread side effects 
विश्वसंचार

Bread side effects : ब्रेड खाणाऱ्यांनो सावधान!

कॅलरीज न वाढताही वाढू शकतं वजन

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगभरातील मानवी आहाराचा अविभाज्य भाग बनलेला ब्रेड आणि भातासारखी कर्बोदके (कार्बोहायड्रेटस्‌‍) तुमच्या शरीरातील चयापचय क्रियेत (मेटाबॉलिझम) छुपी (गुप्तपणे) उलथापालथ करत असल्याचे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, नेहमीपेक्षा जास्त कॅलरीज न घेताही केवळ या पदार्थांच्या निवडीमुळे वजन आणि चरबी वाढू शकते, असा दावा जपानमधील ओसाका मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे.

आतापर्यंत मानले जायचे की जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढते. मात्र, प्रोफेसर शिगेनोबू मत्सुमुरा यांच्या टीमने उंदरांवर केलेल्या प्रयोगात धक्कादायक तथ्ये आढळली. उंदरांना जेव्हा नेहमीच्या अन्नासोबत ब्रेड, गहू किंवा तांदळाचे पीठ देण्यात आले, तेव्हा त्यांनी इतर आहार सोडून केवळ या पदार्थांवर ताव मारला. या उंदरांनी एकूण कॅलरीज जास्त घेतल्या नव्हत्या, तरीही त्यांच्या वजनात मोठी वाढ झाली. याचे मुख्य कारण म्हणजे कर्बोदकांमुळे शरीराची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता मंदावली.

संशोधकांनी ‌‘इनडायरेक्ट कॅलरीमेट्री‌’द्वारे तपासणी केली असता, या आहारात शरीरातील फॅटी ॲसिडस्‌‍ वाढल्याचे आणि अत्यावश्यक अमिनो ॲसिडस्‌‍ कमी झाल्याचे दिसले. यामुळे यकृतामध्ये चरबी साठण्याचे प्रमाण वाढले. संशोधकांच्या मते, हे केवळ गव्हामुळे घडत नसून पिष्टमय पदार्थांच्या अति ओढीमुळे शरीरातील ऊर्जा जाळण्याची प्रक्रिया मंदावते, हे त्याचे प्रमुख कारण आहे. या संशोधनातील दिलासादायक बाब म्हणजे, जसा आहार बदलला आणि पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी केले, तसे वजनातील वाढ आणि मेटाबॉलिझममधील दोष वेगाने सुधारले. भविष्यात हे संशोधन मानवी सवयींवर कसे लागू होते, याचा अभ्यास केला जाणार आहे.

‌‘आम्ही आता मानवी आहार पद्धतींवर लक्ष केंद्रित करत आहोत. संपूर्ण धान्य (होल ग्रेन्स) आणि तंतुमय पदार्थांचा (फायबर) प्रथिने व स्निग्ध पदार्थांसोबतचा मेळ शरीराच्या प्रतिसादावर कसा परिणाम करतो, याचे वैज्ञानिक निकष आम्ही शोधणार आहोत.‌’
- प्रोफेसर शिगेनोबू मत्सुमुरा, ओसाका मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT