वॉशिंग्टन : मेंदू आणि यंत्र यांच्यातील संवाद अधिक सुलभ करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘ब्रेन-मशिन इंटरफेस’ (BMI) या तंत्रज्ञानाचा वापर करून आता थेट प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूशी ‘बोलणे’ शक्य झाले आहे. उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये या तंत्रज्ञानाला मोठे यश मिळाले असून, यामुळे भविष्यात मानवी आरोग्य क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.
निसर्गाने दिलेल्या डोळ्यांसारख्या इंद्रियांचा वापर न करता, हा नवीन वायरलेस डिव्हाईस (यंत्र) थेट मेंदूला माहिती पुरवतो. हे उपकरण अतिशय लवचिक आणि मानवी तर्जनीपेक्षाही लहान आहे. हे मेंदूच्या आत न बसवता केवळ टाळूच्या खाली बसवले जाते. यात 64 सूक्ष्म एलईडी दिवे आणि एक रिसीव्हर अँटेना आहे. बाह्य अँटेनाद्वारे ‘NFC’ (कॉन्टॅक्टलेस पेमेंटमध्ये वापरले जाते तसे तंत्रज्ञान) वापरून हे दिवे नियंत्रित केले जातात. या प्रयोगासाठी उंदरांच्या मेंदूतील पेशींमध्ये विशिष्ट अनुवांशिक बदल करण्यात आले होते, जेणेकरून त्या पेशी प्रकाशाच्या पॅटर्नला प्रतिसाद देतील.
प्रयोगादरम्यान, या उपकरणातून निघणार्या प्रकाश लहरींना उंदरांच्या मेंदूने असा प्रतिसाद दिला, जणू काही ते माहिती डोळ्यांनी पाहत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या उंदरांनी मेंदूतील या लहरींचे अर्थ समजून घ्यायला शिकले आणि प्रयोगशाळेत लपवलेले चविष्ट खाद्य शोधून काढण्याचे कठीण कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि ‘नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी’चे बायोइलेक्ट्रॉनिक्स संशोधक जॉन रॉजर्स यांनी सांगितले की, ‘हे तंत्रज्ञान मूलभूत संशोधनासाठी एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे.
‘हे उपकरण मऊ आणि लवचिक असल्याने डोक्याच्या हाडांच्या आकाराप्रमाणे जुळवून घेते. यामुळे भविष्यात जड वायरिंग किंवा मोठ्या बाह्य उपकरणांशिवाय मेंदूशी संबंधित आजारांवर उपचार करणे शक्य होऊ शकते. हे उपकरण 8 डिसेंबर रोजी ‘नेचर न्यूरोसायन्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासाचा भाग आहे. डोळ्यांसारख्या नैसर्गिक ज्ञानेंद्रियांना वळसा घालून थेट मेंदूला कृत्रिम माहिती पुरवण्याची ही क्षमता विज्ञानातील एक मैलाचा दगड मानली जात आहे.