Electrical Stimulation: गणितासाठी ‌‘डोक्याला शॉक‌’? Pudhari Photo
विश्वसंचार

Electrical Stimulation: गणितासाठी ‌‘डोक्याला शॉक‌’?

एका नवीन संशोधनानुसार, मेंदूला सुरक्षित विद्युत प्रवाहाद्वारे उत्तेजित केल्यास गणित सोडवण्याची क्षमता अधिक प्रभावी होऊ शकते, असे दिसून आले आहे

पुढारी वृत्तसेवा

लंडन : गणिताची कठीण उदाहरणे सोडवताना अनेकदा मेंदूला प्रचंड ताण द्यावा लागतो. मात्र, आता एका नवीन संशोधनानुसार, मेंदूला सुरक्षित विद्युत प्रवाहाद्वारे उत्तेजित केल्यास गणित सोडवण्याची क्षमता अधिक प्रभावी होऊ शकते, असे दिसून आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सरे येथील संशोधकांनी 18 ते 30 वयोगटातील तरुणांवर केलेल्या प्रयोगातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

संशोधकांनी मेंदूच्या डोर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या भागावर लक्ष केंद्रित केले. मेंदूचा हा भाग प्रामुख्याने शिकणे, स्मरणशक्ती आणि एकाग्रता यासाठी जबाबदार असतो. अभ्यासादरम्यान 72 तरुणांना पाच दिवसांचे गणिताचे प्रशिक्षण देण्यात आले. यात काही तरुणांना ट्रान्सक्रॅनियल रँडम नॉइज स्टिम्युलेशन या तंत्रज्ञानाद्वारे मेंदूला अत्यंत कमी दाबाचा आणि वेदनारहित विद्युत प्रवाह देण्यात आला.

न्यूरोबायोलॉजी आणि शिक्षणाचा संबंध

या अभ्यासाचे मुख्य लेखक रोई कोहेन कादोष यांच्या मते, आतापर्यंत शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी केवळ शिक्षकांचे प्रशिक्षण किंवा अभ्यासक्रमात बदल यांसारख्या बाह्य घटकांवर भर दिला जात होता. मात्र, विद्यार्थ्याची न्यूरोबायोलॉजी (मेंदूची रचना) अनेकदा पर्यावरणापेक्षा शिक्षणावर अधिक परिणाम करते. ज्यांच्या मेंदूतील विविध भागांमधील संपर्क कमकुवत असतो, त्यांच्यासाठी हा सुरक्षित विद्युत प्रवाह अत्यंत उपयुक्त ठरला आहे.

मेंदूला दिलेल्या विद्युत प्रवाहामुळे तरुणांची गणिती कोडी सोडवण्याची गती आणि अचूकता वाढल्याचे दिसून आले. ही प्रक्रिया पूर्णपणे वेदनारहित असून, टाळूवर इलेक्ट्रोडस्‌‍ ठेवून मेंदूची कार्यक्षमता वाढवली जाते. विद्युत प्रवाहामुळे मेंदूतील जीएबीए या रसायनाची पातळी कमी होऊन नवीन माहिती लक्षात ठेवणे सोपे होते. या तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक विषमता कमी होऊन प्रत्येकाला आपली पूर्ण क्षमता गाठण्यास मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT