सॅन फ्रान्सिस्को : दिवसेंदिवस प्रगत होणारे तंत्रज्ञान आता मानवाला कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून वाचवू शकणार का? सायन्स फिक्शन चित्रपटातील कल्पनेसारखी वाटणारी ही गोष्ट आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. न्यूरोटेक्नॉलॉजीच्या दुनियेत एक असा चमत्कार घडला आहे, ज्याने वैद्यकीय विज्ञानात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अब्जाधीश एलन मस्क यांच्या 'न्यूरालिंक' कंपनीशी संबंधित एका स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूमध्ये अशा 'ब्रेन इम्प्लांट'ची यशस्वी चाचणी केली आहे, जे थेट कर्करोगाच्या ट्यूमरवर (गाठ) हल्ला करेल. तीन रुग्णांवर करण्यात आलेली ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
सॅन फ्रान्सिस्को येथील 'कोहेरन्स न्यूरो' या लाँगव्हिटी स्टार्टअप कंपनीने हे ब्रेन इम्प्लांट तयार केले आहे. हे डिव्हाइस मानवी मेंदूतील कर्करोगाचा शोध घेण्यास आणि त्यावर उपचार करण्यास प्रभावी ठरू शकते. विशेष म्हणजे, या कंपनीचे धागेदोरे एलन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीशी जोडलेले आहेत. एका अहवालानुसार, कंपनीने नुकतीच तीन रुग्णांवर या उपकरणाची यशस्वी चाचणी घेतली. धोकादायक ट्यूमरचे इलेक्ट्रिकल सिग्नल्स ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी 'ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस'चा वापर करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. ही चाचणी अशा रुग्णांवर करण्यात आली, ज्यांच्यावर ट्यूमर काढण्यासाठी आधीच शस्त्रक्रिया सुरू होती.
शस्त्रक्रियेदरम्यान, बटणाच्या आकाराचे हे इम्प्लांट सुमारे ३० मिनिटांसाठी रुग्णांच्या मेंदूत बसवण्यात आले. या वेळेत उपकरणाची सुरक्षा आणि त्यातून मिळणाऱ्या सिग्नल्सची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर ते सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. पहिले लक्ष्य - ग्लिओब्लास्टोमा: कंपनीचे पहिले लक्ष्य 'ग्लिओब्लास्टोमा' (Glioblastoma) हा आजार आहे, जो मेंदूचा सर्वात आक्रमक आणि जीवघेणा कर्करोग मानला जातो. उद्देश: कर्करोगाच्या वेदनादायी आणि जड उपचारांना बदलून, ते अत्यंत सोपे आणि सतत मॉनिटर करता येण्याजोगे करणे हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. नुकत्याच झालेल्या वैद्यकीय संशोधनातून असे समोर आले आहे की, कर्करोगाच्या पेशी देखील शरीरात इलेक्ट्रिकल पातळीवर सक्रिय असतात.
हे धोकादायक ट्यूमर स्वतःची वाढ करण्यासाठी मेंदूतील चांगल्या पेशींचे बायोइलेक्ट्रिकल सिग्नल्स 'हायजॅक' करतात. 'कोहेरन्स न्यूरो'ची SOMA प्रणाली याच प्रक्रियेला रोखते. हे मायक्रो-इम्प्लांट ट्यूमरच्या अत्यंत सूक्ष्म इलेक्ट्रिकल हालचालींचा अभ्यास करते आणि त्याच वेळी तिथे अचूक इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन (लहरी) सोडते, ज्यामुळे ट्यूमरची वाढ थांबते. या उपचारादरम्यान रुग्णाला कानाच्या वर एका नाण्याच्या आकाराचे 'वेअरेबल डिव्हाइस' परिधान करावे लागेल, जे मोबाईल ॲपशी कनेक्टेड असेल. याद्वारे डॉक्टरांना दूर बसूनही रुग्णाचा रिअल-टाइम डेटा पाहता येईल आणि उपचारांवर नियंत्रण ठेवता येईल.