Brain Chip For Paralysis | अर्धांगवायूच्या रुग्णांना मिळणार ‘ब्रेन चिप’मुळे नवे जीवन..! 
विश्वसंचार

Brain Chip For Paralysis | अर्धांगवायूच्या रुग्णांना मिळणार ‘ब्रेन चिप’मुळे नवे जीवन..!

‘बीसीआय’ तंत्रज्ञानात चीनने एलन मस्क यांना मागे टाकले

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग / नवी दिल्ली : मेंदू आणि संगणक यांना थेट जोडणाऱ्या 'ब्रेन-कम्प्युटर इंटरफेस' (बीसीआय) तंत्रज्ञानाच्या शर्यतीत चीनने अमेरिकेच्या आणि अब्जाधीश एलन मस्क यांच्या 'न्यूरालिंक' कंपनीला मोठा धक्का दिला आहे. चीनने जगातील पहिल्या व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या मेंदूतील चिपला (ब्रेन चिप) मंजुरी दिली असून, यशस्वी क्लिनिकल चाचण्यांनंतर आता याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होणार आहे. एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच या तंत्रज्ञानाला 'जिझस-लेव्हल टेक्नॉलॉजी' (अद्‌भुत किंवा चमत्कारिक तंत्रज्ञान) असे संबोधले होते. मात्र, मस्क यांच्या आधी चीनने हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणून दाखवले आहे.

काय आहे या चिपचे नाव आणि वैशिष्ट्य?

बीजिंगच्या प्रसिद्ध 'त्सिंघुआ युनिव्हर्सिटी' आणि शांघायमधील 'न्यूरॅकल टेक्नॉलॉजी' यांनी संयुक्तपणे ही नाण्यासारख्या आकाराची चिप विकसित केली असून, तिला 'निओ' असे नाव देण्यात आले आहे. एलन मस्क यांची न्यूरालिंक (एन१) चिप थेट मेंदूच्या पेशींच्या आत (सेरेब्रल कोर्टेक्‍स) घुसवली जाते, त्‍यामुळे वैद्यकीय धोका जास्त असतो. याउलट, चीनची 'निओ' चिप कवटी आणि मेंदूच्या मधल्या भागात, म्हणजेच मेंदूच्या बाहेरील संरक्षणात्मक पडद्यावर बसवली जाते.

३६ रुग्णांवर यशस्वी प्रयोग

आतापर्यंत ३६ रुग्णांवर या चिपच्या यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. पाठीच्या कण्याला दुखापत झालेले (स्‍पायनल कॉर्ड इन्‍जुरीज) आणि अर्धांगवायू (पॅरेलेसिस) मुळे अपंगत्व आलेल्या रुग्णांना त्यांच्या मज्जासंस्थेवर पुन्हा नियंत्रण मिळवून देण्यासाठी ही चिप अत्यंत प्रभावी ठरली आहे.

केवळ विचाराने चालणार कॉम्प्युटर!

या तंत्रज्ञानामुळे मेंदूतील लहरींचे रूपांतर डिजिटल कमांडस्‌मध्ये होते. म्हणजेच, रुग्ण केवळ 'विचारांच्या' जोरावर कॉम्प्युटरचा कर्सर हलवू शकतील, टाईप करू शकतील किंवा कृत्रिम अवयव चालवू शकतील. भविष्यात याचा वापर पार्किन्सन, अपस्मार (इपिलेप्‍सी) आणि नैराश्यासारख्या (डिप्रेशन) गंभीर आजारांवर उपचारासाठी केला जाईल.

हॅकिंगचा मोठा धोका

या क्रांतीसोबतच सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी एक मोठा इशाराही दिला आहे. त्यांच्या मते, जर ही चिप हॅक झाली, तर हॅकर्स रुग्णांचे विचार, त्यांच्या आठवणी चोरू शकतात किंवा त्यांच्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण मिळवून त्यांना हानी पोहोचवू शकतात. सध्या मस्क यांची 'न्यूरालिंक' अमेरिकेत ९ रुग्णांवर चाचण्या करत आहे. परंतु, त्यांना अजूनही बाजारात व्यावसायिक विक्रीसाठी परवानगी मिळालेली नाही, त्‍यामध्‍ये चीनने बाजी मारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT