Ancient Burial Ritual | मुलासोबत दफन केलं स्वर्गाच्या ‘नावाड्याचे भाडे!’ 
विश्वसंचार

Ancient Burial Ritual | मुलासोबत दफन केलं स्वर्गाच्या ‘नावाड्याचे भाडे!’

पुढारी वृत्तसेवा

लंडन : बल्गेरियामध्ये काळ्या समुद्राच्या जवळ आर्कियोलॉजिस्टसना रोमन काळातील एका मुलाची कबर सापडली आहे. स्टारा जागरा शहरात एका नव्या अपार्टमेंट आणि पार्किंग प्रोजेक्टच्या सर्व्हेच्या दरम्यान ही कबर सापडली. या कबरीत कानातील सोन्याची सुंदर डुलं आणि एक छोटं ब्राँझचं नाणंही सापडलं. या दुर्लभ नाण्याला ‘अंटोनिनियानस’ म्हटलं जातं. हे नाणं २७४ वा २७५ इसवी सनाच्या आसपासचं असण्याची शक्यता संशोधनातून वर्तवली गेली आहे. प्राचीन रोम आणि ग्रीक मान्यतेनुसार, मृत्यूनंतर आत्म्याला नदी पार करणाऱ्या नावाड्याला भाडं द्यावं लागतं, त्यामुळेच शोकाकुल कुटुंबाने मुलाचा स्वर्गाचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तिकीट म्हणून हे नाणं कबरीत ठेवलं होतं!

प्राचीन ग्रीक आणि रोमन परंपरांमध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत खास परंपरेला मान्यता दिली होती. या मान्यतेनुसार, आत्मा स्वर्गात जाण्यासाठी कॅरन नावाचा नावाडी एक पौराणिक नदी पार करून द्यायचा. ही नदी पार करण्याच्या बदल्यात नावाड्याला शुल्क द्यावे लागायचे. संशोधकांच्या मते, कबरीतील मुलाजवळचं हे ब्राँझचं नाणं त्या नावाड्याला भाडं म्हणून देण्यासाठी कबरीत ठेवलं असावं. दु:खी कुटुंबाने मुलाच्या सुरक्षित प्रवासासाठी कबरीत नाणं ठेवलं होतं, हा त्याचाच पुरावा आहे, असंही संशोधकांचं म्हणणं आहे.

स्टारा जागरामध्ये जमिनीखाली एक मोठं कब्रस्तान सापडलं आहे. शहराच्या जुन्या भिंतीच्या बाहेर हे कब्रस्तान सापडलंय. या कब्रस्तानाचा वापर तब्बल तीन शतके केला जायचा. या ठिकाणी खोदण्यात आलेल्या १३५ कबरींपैकी या मुलाची कबर वेगळीच होती. या मुलाची कबर सजवलेली होती. त्याच्यासोबत सोन्याची डुलं आणि थ्रेसचं ब्राँझचं नाणं होतं. मात्र, या मुलाचं वय आणि मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. नाण्यावरील तारखेमुळे या मुलाचा मृत्यू २७४ वा २७५ इसवी सनाच्या आसपास झाला असावा असं सांगितलं जातं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT