वॉशिंग्टन : 'नासा'कडून अनेक वेळा ग्रह-तार्यांची किंवा ब्रह्मांडातील विशिष्ट घटकांची छायाचित्रे शेअर केली जात असतात. आता 'नासा'ने आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूची अशीच एक प्रतिमा शेअर केली आहे. यामध्ये गुरू ग्रह निळसर रंगाचा दिसून येतो. हे छायाचित्र 'हबल' या अंतराळ दुर्बिणीने टिपले आहे.
'नासा'ने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, आपल्या सौरमंडळातील विशाल ग्रह गुरूला अतिनील द़ृश्यामध्ये पाहता येऊ शकते. अशा अल्ट्राव्हायोलेट द़ृश्यांसमवेत गुरूवरील वादळे अधिक स्पष्टपणे पाहता येतात. अनेक युजर्सनी 'नासा'ने शेअर केलेल्या या छायाचित्राला पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गुरू हा ग्रह पृथ्वीपेक्षा अकरा पट मोठ्या आकाराचा आहे. हा ग्रह पृथ्वीसारखा ठोस, खडकाळ पृष्ठभागाचा नसून तो निव्वळ वायूचा एक विशाल गोळा आहे.
याठिकाणी केवळ वायू आणि त्यांची वादळेच असतात. तिथे एखादे यान पाठवले तर त्याला उतरण्यासाठी जमीन मिळणार नाही; शिवाय या वायूंच्या तडाख्यात सापडून त्याचीच वाफ होऊन जाईल! मात्र गुरूच्या अनेक चंद्रांपैकी काही बर्फाळ चंद्र नेहमीच संशोधकांच्या कुतूहलाचा विषय बनलेले आहेत.