नवी दिल्ली : चहाचेही अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये निळ्या गोकर्णीच्या चहाचा समावेश होतो. हा चहा गोकर्ण किंवा अपराजिता (शास्त्रीय नाव : Clitoria ternatea) या वनस्पतीच्या सुंदर निळ्या फुलांपासून बनवला जातो. हा चहा केवळ दिसायलाच आकर्षक नाही, तर तो आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदात या फुलांचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे.
या चहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो कॅफीन-मुक्त असतो आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असतो. निळ्या गोकर्णीच्या फुलांमध्ये ‘अँथोसायनिन्स’ नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री-रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळतात आणि पेशींचे संरक्षण करतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. हा चहा मेंदूसाठी ‘नूट्रॉपिक’ म्हणून काम करतो, म्हणजेच तो मेंदूची कार्यक्षमता वाढवतो. नियमित सेवनाने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.
यामध्ये असलेले घटक तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे मनःशांती मिळते. यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील ‘’कोलेजन’ निर्मितीला चालना देतात, ज्यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते. हे अकाली वृद्धत्वाची लक्षणे, जसे की सुरकुत्या आणि डाग, कमी करण्यास मदत करते. केसांच्या मुळांमधील रक्तप्रवाह सुधारून केसगळती कमी करण्यास आणि केसांची वाढ सुधारण्यासही हे उपयुक्त आहे.
काही अभ्यासांनुसार, निळ्या गोकर्णीचा चहा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. हा चहा शरीरातील चयापचय क्रिया सुधारतो आणि अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करू शकतो. जरी हा चहा नैसर्गिक आणि सुरक्षित असला, तरी गर्भवती किंवा स्तनपान करणार्या महिलांनी तसेच कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये.