मानवाला वाचविणारा निळ्या रक्ताचा समुद्री जीव स्वत:ला वाचविण्यासाठी लढतोय! 
विश्वसंचार

Blue Blood Marine Creature | मानवाला वाचविणारा निळ्या रक्ताचा समुद्री जीव स्वत:ला वाचविण्यासाठी लढतोय!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : डायनासोर पृथ्वीवर येण्यापूर्वी लाखो वर्षांपासून समुद्राच्या तळाशी एक विचित्र प्राणी वावरत होता. हा जीव एखाद्या टोकदार हेल्मेटसारखा दिसत होता, डोक्यावर छोटे डोळे आणि मागे टोकदार शेपटी बाहेर आलेली असायची. हा समुद्री जीव म्हणजे हॉर्सशू क्रॅब (नाल-खेकडा). त्याला हॉर्सशू क्रॅब म्हटले जात असले तरी, तो खेकड्यांच्या गटातील नसून, तो कोळ्यांशी (स्पायडर) अधिक जवळचा आहे. 450 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांमध्येही (फॉसिल्स) हॉर्सशू क्रॅबचे अस्तित्व आढळले आहे. या चार प्रजातींच्या प्राण्यांनी आपला आकार फारसा बदललेला नाही, त्यामुळे त्यांना जिवंत जीवाश्म असेही म्हटले जाते.

प्राचीन असूनही, हॉर्सशू क्रॅब आधुनिक जगात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. या जीवाचे गडद निळे रक्त लाखो मानवी जीव वाचवण्यासाठी वापरले जाते. त्याच्या निळ्या रक्तात हिमोसायनीन नावाचे ऑक्सिजन वाहून नेणारे रंगद्रव्य असते, जे आपल्या लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनसारखेच कार्य करते. या रक्तामध्ये अमीबोसाइटस् नावाच्या शक्तिशाली रोगप्रतिकारक पेशी असतात. या पेशी बॅक्टेरियामुळे निर्माण होणार्‍या विषारी घटकांबाबत अत्यंत संवेदनशील असतात. लसी किंवा शिरेवाटे दिली जाणारी औषधेजर एन्डो टॉक्सिनने दूषित झाली, तर रुग्णाला इंजेक्शन ताप येतो, जो जीवघेणा ठरू शकतो. सशाऐवजी क्रॅबची तपासणीपूर्वी लस किंवा औषधांमध्ये विषारी घटक आहेत की नाही, हे तपासण्यासाठी सशांना इंजेक्शन दिले जात असे आणि त्यांना ताप आल्यास ती बॅच दूषित मानली जाई. 1960 च्या दशकात, अमेरिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञांनी पाहिले की हॉर्सशू क्रॅबचे निळे रक्त एन्डो टॉक्सिनच्या संपर्कात आल्यास झटपट गोठत.

हॉर्सशू क्रॅबच्या शरीरात, हे गोठणे त्यांना बॅक्टेरियाच्या संसर्गापासून वाचवते. आता संशोधनासाठी शास्त्रज्ञ सशांचा वापर करण्याऐवजी हॉर्सशू क्रॅबचा वापर करतात. दरवर्षी लाखो हॉर्सशू क्रॅब समुद्रातून पकडले जातात. त्यांच्या शरीरातील सुमारे एक तृतीयांश रक्त काढून घेतले जाते. या रक्ताचा उपयोग शिरेवाटे दिल्या जाणार्‍या औषधे आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये एन्डो टॉक्सिनची चाचणी घेण्यासाठी केला जातो. कोव्हिड-19 लसींच्या निर्मितीच्या काळात या निळ्या रक्ताची मागणी प्रचंड वाढली होती. रक्त काढण्याच्या प्रक्रियेत 15 ते 30 टक्के क्रॅबचा मृत्यू होतो. यामुळे क्रॅबचे जतन आणि संर्वधन व्हावे, ते नामशेष होऊ नयेत यासाठी पर्यावरणवादी या चाचण्यांसाठी सिंथेटिक पर्यायांचा वापर करण्याची मागणी करत आहेत.

1990 च्या दशकात सिंगापूरमधील संशोधकांनी हॉर्सशू क्रॅबच्या डीएनएवर आधारित सिंथेटिक संयुगे विकसित केली, जी क्रॅबचे रक्त न वापरता तेच कार्य करू शकतात. सिंथेटिक संयुगाच्या वैद्यकीय वापरासाठी वापरासाठी नियामकांनी उशिरा का होईना, पण 2016 मध्ये युरोपमध्ये आणि 2024 मध्ये अमेरिकेत मान्यता दिली. त्यामुळे आता औषध कंपन्या सिंथेटिक पर्यायांकडे वळत आहेत. हा निर्णय केवळ हॉर्सशू क्रॅबसाठीच नव्हे, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या इतर प्रजातींसाठीही महत्त्वपूर्ण ठरला आहे. हॉर्सशू क्रॅबची अंडी स्थलांतरित पक्ष्यांसाठी, विशेषतः रेड नॉट नावाच्या पक्ष्यांसाठी, त्यांच्या लांब पल्ल्याच्या उड्डाणादरम्यान अत्यंत महत्त्वाचे अन्न ठरतात. या जीवाला वाचवण्याची ही काळजीवाहू शर्यत आता सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT