Eye Scan Blood Test | डोळ्यांच्या छोट्या व्हिडीओवरून होणार चक्क रक्त तपासणी 
विश्वसंचार

Eye Scan Blood Test | डोळ्यांच्या छोट्या व्हिडीओवरून होणार चक्क रक्त तपासणी

शास्त्रज्ञांचा नवा शोध

पुढारी वृत्तसेवा

लंडन : रक्तातील लाल रक्तपेशींचे प्रमाण तपासण्यासाठी आता सुई टोचून रक्त काढण्याची गरज भासणार नाही. संशोधकांनी एक अशी प्रणाली विकसित केली आहे, जी डोळ्यांच्या एका लहान व्हिडीओच्या मदतीने व्यक्तीच्या रक्तातील लाल पेशींचे प्रमाण अचूक ओळखू शकते. ‘एनपीजे डिजिटल मेडिसिन’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 224 जणांवर केलेल्या चाचणीत, या तंत्रज्ञानाने 80 टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये ‘अ‍ॅनिमिया’ (रक्तक्षय) चे अचूक निदान केले आहे.

हे तंत्रज्ञान सध्याच्या पारंपरिक रक्त तपासणीची जागा घेण्यासाठी लगेच तयार नसले, तरी ज्यांना पुढील सखोल तपासणीची गरज आहे, अशा रुग्णांना शोधण्यासाठी हे एक उत्तम ‘स्क्रीनिंग टूल’ म्हणून काम करू शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. विशेषतः गरीब किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, जेथे प्रयोगशाळांची कमतरता आहे, तेथे हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरेल. लंडन इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजीमधील कृत्रिम वैद्यकीय बुद्धिमत्ता (एआय) प्रयोगशाळेच्या संशोधक डॉ. क्रिस्टीन किएरे यांनी सांगितले की ‘या तंत्रज्ञानाचा खरा फायदा वारंवार, वेदनारहीत देखरेख करण्यासाठी किंवा पुढील उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची लवकर ओळख पटवण्यासाठी होऊ शकतो.

जर हे तंत्रज्ञान स्वस्त आणि प्रमाणित झाले, तर मर्यादित संसाधने असलेल्या भागात रक्त तपासणी करणे खूप सोपे होईल.‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. थियोडोर लेंग यांच्या मते, ज्या ठिकाणी वारंवार रक्त काढणे आणि त्याची तपासणी करणे कठीण असते, अशा ठिकाणी ही पद्धत खूप फायदेशीर ठरेल. यामध्ये पुढील क्षेत्रांचा समावेश असू शकतो. बाह्यरुग्ण तपासणी, घरातील आरोग्य देखरेख, डायलिसिस आणि कर्करोग उपचारांनंतरचे फॉलो-अप्स, बालरोग विभाग. तथापि, हे तंत्रज्ञान अद्याप पूर्णपणे व्यावसायिक वापरासाठी तयार नाही. ओरेगन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीचे डॉ. पीटर कॅम्पबेल यांनी स्पष्ट केले की, ‘हे एक उत्तम संशोधन आहे; परंतु ते क्लिनिकमध्ये प्रत्यक्षात वापरण्यासाठी अजून अनेक टप्पे पार करावे लागतील.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT