भिलाई : मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज इन्सुलीनचे इंजेक्शन घ्यावे लागते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी एका अशा नवीन ‘पॉलिमर-आधारित जेल’चा शोध लावला आहे, ज्यामुळे सुईचा वापर न करता केवळ त्वचेद्वारे इन्सुलीन शरीरात पोहोचवता येईल.
‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, हे जेल लावल्यानंतर अवघ्या 1 ते 2 तासांत मधुमेह असलेल्या उंदीर आणि डुकरांच्या रक्तातील साखर सामान्य झाली. विशेष म्हणजे, या प्राण्यांच्या साखरेची पातळी पुढील सुमारे 12 तासांपर्यंत सामान्य मर्यादेत राहिली. या जेलचा वेग आणि दीर्घकालीन परिणाम हे ‘बेसल’ इन्सुलीन इंजेक्शनच्या बरोबरीचे आहेत. ‘बेसल’ इन्सुलीन शरीरातील साखरेची पातळी जेवणाच्या दरम्यान आणि रात्रीच्या वेळी स्थिर ठेवण्याचे काम करते. ‘हे जेल तांत्रिकद़ृष्ट्या अत्यंत प्रगत आणि प्रभावी आहे,’ असे भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) भिलाई येथील ‘बायोमटेरिअल्स लॅबोरेटरी’चे प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक सुचेतन पाल यांनी सांगितले. (पाल या संशोधनात थेट सहभागी नव्हते).
मानवी त्वचेचा वरचा थर (Stratum Corneum) अत्यंत पातळ असला, तरी तो एक संरक्षक कवच म्हणून काम करतो. इन्सुलीनसारखी मोठी प्रथिने सहजासहजी हे कवच ओलांडून आत जाऊ शकत नाहीत. संशोधकांनी यावर उपाय म्हणून एक ‘pH-रिस्पॉन्सिव्ह पॉलिमर’ (OP) तयार केला आहे, जो त्वचेच्या अडथळ्याला पार करून इन्सुलीन थेट शरीरात पोहोचवण्यास मदत करतो. त्वचेच्या पृष्ठभागाचा कि सुमारे 5 असतो, जो आम्लयुक्त आहे. मात्र, त्वचेच्या खोल थरांमध्ये हा pH वाढत जाऊन 7 (उदासीन/ Neutral) च्या जवळ पोहोचतो. उंदीर आणि डुकरांच्या त्वचेवर केलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांनी याची पुष्टी केली आहे की, ‘OP’ पॉलिमर त्वचेच्या सर्व थरांमध्ये खोलवर शिरू शकतो; याउलट केवळ इन्सुलीनचा वापर केल्यास ते त्वचेच्या पृष्ठभागावरच अडकून राहते. या यशानंतर, संशोधकांनी ‘OP-इन्सुलीन जेल’ प्राण्यांच्या त्वचेवर लावून त्यांच्या रक्तातील साखर कमी होते का, याची चाचणी केली.
हे संशोधन सध्या प्रायोगिक तत्त्वावर आहे. आतापर्यंत या जेलची चाचणी केवळ उंदीर आणि डुकरांवर करण्यात आली असून, मानवावर अद्याप चाचणी झालेली नाही. मानवी त्वचेची जाडी, चरबीचे प्रमाण आणि pH पातळी प्राण्यांपेक्षा वेगळी असते, त्यामुळे मानवामध्ये याचे परिणाम कसे असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.