नवी दिल्ली : एकाच दिवशी जन्मलेली दोन माणसे पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने म्हातारी होऊ शकतात. एक व्यक्ती तुलनेने निरोगी राहू शकते, तर दुसरी व्यक्ती जुनाट आजारांनी ग्रस्त होऊ शकते. आता वैज्ञानिकांना अशा लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये एक महत्त्वाचा फरक सापडला आहे, जे वयानुसार होणाऱ्या आजारांना जास्त बळी पडतात. या संशोधनामुळे काही लोक दीर्घकाळ निरोगी का राहतात, याचे कोडे सुटण्यास मदत होऊ शकते.
शुक्रवारी (९ ऑक्टोबर) ‘इम्युनिटी’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, वैज्ञानिकांनी रक्तातील एक विशेष ‘प्रोटिन सिग्नेचर’ ओळखले आहे, जे निरोगी म्हातारपणाचा अंदाज वर्तवू शकते. तरुणांच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये ‘नाईव्ह टी-सेल्स’ नावाच्या पांढऱ्या पेशी मोठ्या प्रमाणावर असतात. काळाच्या ओघात जंतू आणि लसीकरणामुळे यापैकी काही पेशी ‘मेमरी सेल्स’मध्ये रूपांतरित होतात. या मेमरी सेल्स ‘ग्रॅनझाईम्स’ नावाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रोटिन तयार करतात, जे संक्रमित पेशी नष्ट करतात.
ग्रॅनझाईम ‘के’ (K) आणि ग्रॅनझाईम ‘बी’ (B) हे त्यांचे प्रमुख प्रकार आहेत. ज्या व्यक्तींच्या रक्तात ग्रॅनझाईम ‘बी’ तयार करणाऱ्या पेशींपेक्षा ग्रॅनझाईम ‘के’ तयार करणाऱ्या पेशींचे प्रमाण जास्त असते, त्यांचे म्हातारपण अधिक निरोगी आणि सुदृढ असल्याचे संशोधनात आढळले. या संशोधनाचे सह-लेखक आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे इम्युनॉजिस्ट मॅक्सिम आर्त्योमोव्ह यांनी सांगितले की, ‘भविष्यात एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील ग्रॅनझाईम ‘के’ आणि ‘बी’ तयार करणाऱ्या पेशींचा समतोल तपासणी करून, संबंधित व्यक्ती म्हातारपणाच्या योग्य मार्गावर आहे की नाही, हे ठरवण्यासाठी चाचणी म्हणून वापरले जाऊ शकते.
’ यापूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले होते की, वृद्ध उंदरांच्या विविध ऊतींमध्ये ग्रॅनझाईम ‘के’ निर्माण करणाऱ्या पेशी जमत जाऊन जळजळ निर्माण करतात. तसेच वृद्धांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्येही अशीच वाढ दिसून आली होती. नवीन अभ्यासात मात्र वैज्ञानिकांनी ग्रॅनझाईम ‘बी’ तयार करणाऱ्या पेशींच्या गत्यात्मकतेचा (dynamics) नवा पैलू उजेडात आणला आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर प्रकाश पडला आहे.