वॉशिंग्टनः जगातील सर्वात थंड खंड असलेल्या अंटार्क्टिकामध्ये असलेला ‘ब्लड फॉल्स’ हा धबधबा अनेक वर्षांपासून वैज्ञानिकांसाठी कोडे बनला होता. दूरून पाहिल्यास हा धबधबा जणू रक्त वाहत असल्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याभोवती अनेक तर्क-वितर्क आणि अफवा पसरल्या होत्या. मात्र, नव्या वैज्ञानिक संशोधनामुळे या लाल रंगामागील खरे कारण स्पष्ट झाले आहे.
हा धबधबा टेलर ग्लेशियर मधून वाहतो आणि त्याचा लालसर रंग हा कोणत्याही रक्तामुळे नसून नैसर्गिक रासायनिक प्रक्रियेचा परिणाम असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. संशोधनानुसार, टेलर ग्लेशियरच्या सुमारे ४०० मीटर खाली लाखो वर्षांपासून अडकून राहिलेले अत्यंत खारट आणि लोहयुक्त पाणी बाहेर येते. हे पाणी वातावरणातील ऑक्सिजनच्या संपर्कात येताच त्यातील लोहाचे ऑक्सिडेशन होते. यामुळे गंजासारखा लालसर रंग तयार होतो आणि संपूर्ण धबधबा रक्तासारखा दिसू लागतो. प्रत्यक्षात येथे रक्ताचा कोणताही संबंध नसून हा पूर्णपणे नैसर्गिक रासायनिक बदल आहे.
हा शोध पृथ्वीवरील अत्यंत प्रतिकूल वातावरणातील नैसर्गिक प्रक्रियांना समजून घेण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या धबधब्याचा शोध १९११ मध्ये ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ ग्रिफिथ टेलर यांनी लावला होता. सुरुवातीला लाल रंगाचे कारण शैवाल असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. नंतरच्या संशोधनातून हा समज चुकीचा ठरला. २०१७ मध्ये रडार तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्लेशियरच्या आत लपलेल्या पाण्याच्या वाहिन्यांचा शोध लागला. यावर्षी प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात ग्लेशियरमधील भेगांमधून दाबाखालील खारट पाणी बाहेर येत असल्याचे अधिक स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शतकभराचे हे रहस्य जवळपास पूर्णपणे उलगडले आहे.