नवी दिल्ली : बिघडलेली जीवनशैली आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे आजकाल अनेकांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. ऑफिसमध्ये तासन्तास एकाच जागी बसून राहणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कंबर, पाठ आणि नितंबदुखीचा त्रास सामान्य झाला आहे. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात; पण आपल्या आहाराकडे मात्र दुर्लक्ष करतात. चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात काळ्या चण्याचा समावेश केला, तर तुम्ही या अंगदुखीपासून स्वतःचा बचाव करू शकता, असे तज्ज्ञ सांगतात.
काळ्या चण्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे शरीराला आतून पोषण देतात आणि स्नायू तसेच हाडे मजबूत बनवतात. जर तुम्हालाही पाठदुखी किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर रोजच्या आहारात एक वाटी उकडलेल्या चण्यांचा समावेश करू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उकडलेले काळे चणे हे प्रोटिन, आयर्न (लोह), फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यासारख्या पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. याच्या सेवनाने शरीराला पुढीलप्रमाणे मोठे फायदे होतात : प्रोटिनचा उत्तम स्रोत : काळ्या चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन आढळते.
स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि त्यांना मजबूत बनवण्यासाठी प्रोटिन अत्यंत आवश्यक मानले जाते. मजबूत स्नायूंमुळे शरीराला उत्तम आधार मिळतो. आयर्नची (लोह) : काळ्या चण्यामध्ये आयर्नचे प्रमाण खूप चांगले असते. आयर्न शरीरातील सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो आणि ऊर्जा टिकून राहते. मॅग्नेशियम समृद्ध : यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाणही अधिक असते, जे स्नायू आणि नसांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे.
फॉस्फरसचा स्रोत : हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी फॉस्फरस हे एक महत्त्वाचे खनिज मानले जाते. संतुलित आहारात याचे योग्य प्रमाण हाडांना वज्रासारखे मजबूत बनवते. रात्रीच्या वेळी काळे चणे पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी ते उकडून घ्यावेत. तुम्ही हे चणे सॅलडमध्ये मिक्स करून, हलके मसाले टाकून किंवा सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता. चण्याची चव आणि पोषण आणखी वाढवण्यासाठी तुम्ही त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लिंबू आणि कोथिंबीर मिक्स करू शकता.