वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाचा तुकडा असलेल्या आणि ‘ब्लॅक ब्युटी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका प्राचीन उल्केमध्ये पाण्याचे अस्तित्व असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. विशेष म्हणजे, या उल्केचा कोणताही भाग नष्ट न करता ‘न्यूट्रॉन स्कॅनिंग’च्या साहाय्याने हे पाणी शोधण्यात यश आले आहे.
या उल्केचे अधिकृत नाव ‘छथअ 7034’ असे आहे. 2011 मध्ये मोरोक्कोच्या सहारा वाळवंटात भटक्या जमातींना हा साधारणत: 320 ग्रॅम वजनाचा खडक सापडला होता. शास्त्रज्ञांच्या मते, हा कोळशासारखा दिसणारा खडक किमान 4.44 अब्ज वर्षे जुना आहे. मंगळावरून मिळालेली ही आजवरची सर्वात जुनी उल्का आहे. हा खडक मंगळावरील ‘कराठा’ विवरातून सुमारे 50 ते 100 लाख वर्षांपूर्वी अवकाशात फेकला गेला असावा आणि नंतर तो पृथ्वीवर कोसळला. यापूर्वी 2013 मध्येही या उल्केत पाण्याचे अंश सापडले होते; परंतु ते तपासण्यासाठी उल्केचे छोटे तुकडे करून ते नष्ट करावे लागत असत.
मात्र, 13 जानेवारी रोजी ‘रीदर्ळीं’ सर्व्हरवर प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासानुसार, आधुनिक स्कॅनिंगमुळे या उल्केतील पाण्याचे संपूर्ण विश्लेषण करणे शक्य झाले आहे. या संशोधनातून समोर आले आहे की, 1) ‘ब्लॅक ब्युटी’च्या एकूण वस्तुमानापैकी साधारणत: 0.6 टक्के हिस्सा पाण्याचा आहे. 2) हे प्रमाण पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. 3) हे पाणी अंशतः गरम असावे असे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे तिथे सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वासाठी अनुकूल परिस्थिती असावी, अशी शक्यता बळावली आहे.
संशोधनाचे महत्त्व : जॉन्स हॉपकिन्स आणि इतर संस्थांच्या संशोधकांच्या मते, या शोधामुळे मंगळावर एकेकाळी उष्ण पाण्याचे प्रवाह होते, या सिद्धांताला बळकटी मिळाली आहे. जर तिथे पाणी गरम होते, तर मंगळावर एकेकाळी सूक्ष्मजीव अस्तित्वात असण्याची दाट शक्यता आहे.