विश्वसंचार

गरजेनुसार मेंदूतील ‘जीपीएस’ उघडतात पक्षी!

Arun Patil

न्यूयॉर्क : पक्ष्यांचा मेंदू 'ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम' (जीपीएस) सारखे काम करतो. हा 'जीपीएस' एखाद्या स्विचसारखा असतो. त्याला पक्षी आपल्या सोयीने 'अ‍ॅक्टिवेट' व 'डिसअ‍ॅक्टिवेट' करू शकतात. त्याचा संबंध पृथ्वीच्या केंद्रात बनणार्‍या चुंबकीय क्षेत्राशीही असतो असे संशोधकांनी म्हटले आहे.

पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र आपल्याला सौरवादळांपासून वाचवत असतात. पक्ष्यांच्या मेंदूत 'क्लस्टर एन' नावाचा भाग असतो जो या चुंबकीय क्षेत्राचा छडा लावतो व त्याला 'प्रोसेस' करतो. कॅनडाच्या वेस्टर्न ओंटारियो युनिव्हर्सिटी आणि अमेरिकेच्या बॉलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीने एकत्र येऊन याबाबतचे संशोधन केले आहे.

युरोपियन जर्नल ऑफ न्यूरो सायन्समध्ये त्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की 'क्लस्टर एन' हे पक्ष्यांच्या मॅग्नेटिक कंपासला सक्रिय करते. पक्षी उड्डाण करीत असताना किंवा स्थलांतर करीत असताना या 'क्लस्टर एन'ला स्वतःच सक्रिय करतात. यापूर्वीच्याही एका संशोधनात आढळले होते की पक्षी दिशा शोधण्यासाठी (नेव्हिगेशन) चुंबकीय रूपाने संवेदनशील प्रोटिन-क्रिप्टोक्रोमेसचा वापर करतात. हे प्रोटिन त्यांच्या डोळ्यातील रेटिनामध्ये असते.

या संशोधनासाठी सफेद गळ्याच्या चिमणीचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये आढळले की चिमणी रात्री उड्डाण करीत असताना 'क्लस्टर एन'ला सक्रिय करते आणि आराम करतेवेळी त्याला 'बंद' करते. पृथ्वीच्या केंद्रात बनणार्‍या या चुंबकीय क्षेत्राला माणूस पाहू शकत नाही; पण पक्षी आणि काही प्राणी त्याचा छडा लावू शकतात. जर आपल्याला पक्ष्यांच्या स्थलांतराला समजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्यांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीसही समजून घ्यावे लागेल. पक्षी स्थलांतरावेळी केवळ चुंबकीय क्षेत्रच नव्हे तर सूर्य आणि तार्‍यांवरही लक्ष देत असतात.

SCROLL FOR NEXT