वॉशिंग्टन : पक्ष्यांनी खडतर आणि बर्फाच्छादित आर्क्टिक भागांमध्ये अतिशय प्राचीन काळीही घरटी बांधण्यास सुरुवात केली होती, हे आता नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे आणि ही वेळ याआधीच्या अंदाजांपेक्षा तब्बल 25 दशलक्ष वर्षांनी मागे जाते. याचा अर्थ तब्बल 73 दशलक्ष वर्षांपूर्वी उत्तर ध्रुवावरील या सध्या अतिथंड असलेल्या भूभागात चक्क पक्ष्यांचा किलबिलाट होता, त्यांची घरटी, अंडी व पिल्लीही होती!
अलास्काच्या उत्तर भागात सापडलेल्या 50 हून अधिक जीवाश्मांमध्ये पक्ष्यांची अंडी आणि नुकतेच जन्मलेले पिल्ले यांचा समावेश आहे. यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की जुरासिक-पश्चात काळात, म्हणजे डायनासोरांच्या युगात, आधुनिक पक्ष्यांचे काही पूर्वज आर्क्टिकमध्ये स्थलांतर करीत असावेत किंवा त्यांनी तिथल्या हवामानाशी जुळवून घेतले असावे. ‘सामान्यतः असे मानले जाते की हे पक्षी इतक्या प्रगत वर्तनास सक्षम नव्हते,’ असे या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि प्रिन्स्टन विद्यापीठातील जीवाश्मशास्त्र विषयातील पीएच.डी. विद्यार्थिनी लॉरेन विल्सन यांनी सांगितले.
‘तेव्हा तुम्ही नवजात पिल्लाप्रमाणे थंडी सहन करत आहात किंवा तीन महिन्यांचे झाल्यावर 2,000 कि.मी. प्रवास करत आहात, या कोणत्याही गोष्टींची अपेक्षा त्या काळातील पक्ष्यांकडून केली जात नव्हती,’ असे त्या म्हणाल्या. पक्ष्यांनी स्थलांतर केले असावे किंवा थंडीच्या हंगामात तिथेच टिकून राहिले असावेत. हे दोन्ही प्रकारचे वर्तन दर्शवणारा हा सर्वात जुना पुरावा आहे. आजही काही पक्षी जसे की आयव्हरी गल (Pagophila eburnea) आणि स्नोई आऊल (Bubo scandiacus) आर्क्टिकमध्ये घरटी बांधतात, पण या अभ्यासातून समोर आलेय की हे वर्तन त्या काळात म्हणजे डायनासोर नष्ट होण्याआधी अस्तित्वात होते.
‘आज अनेक पक्षी आर्क्टिकमध्ये घरटी बांधतात आणि ते तिथल्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. हे जीवाश्म दाखवतात की ते लाखो वर्षांपूर्वीपासून तसेच होते,’ असे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरो येथील जीवाश्मशास्त्र व उत्क्रांती विषयाचे प्राध्यापक आणि अभ्यासाचे समिक्षक स्टीव्ह ब्रुसाटे यांनी सांगितले.