Richest YouTuber loss | एका पक्ष्याने केले सर्वात श्रीमंत यूट्यूबरचे कोट्यवधीचे नुकसान! 
विश्वसंचार

Richest YouTuber loss | एका पक्ष्याने केले सर्वात श्रीमंत यूट्यूबरचे कोट्यवधीचे नुकसान!

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत यूट्यूबर जिमी डोनाल्डसन, ज्याला जग ‘मिस्टर बीस्ट’ म्हणून ओळखते, तो आपल्या व्हिडीओंमधील धाडसी प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, नुकताच त्याने एक असा खुलासा केला आहे की, त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आणि महागड्या शूटमध्ये एका ‘बाल्ड ईगल’ (एक प्रजातीचा गरुड) पक्षाने असा अडथळा आणला की त्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

मिस्टर बीस्टने हा किस्सा ‘द टुनाइट शो विथ जिमी फॉलन’मध्ये सांगितला. त्याने एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन केले होते. प्लॅन असा होता की, एका व्यक्तीला एक आलिशान नौका द्यायची आणि ती तलावाच्या मध्यभागी ठेवून 20 तोफांच्या साहाय्याने ती बुडवण्याचा प्रयत्न करायचा. त्या व्यक्तीला मिस्टर बीस्टचे क्रेडिट कार्ड वापरून आपली नौका वाचवायचे आव्हान दिले होते. शूटची पूर्ण तयारी झाली होती आणि त्यावर मोठी रक्कम खर्च करण्यात आली होती. तोफा डागण्यापूर्वीच क्रू मेंबर्सच्या लक्षात आले की तलावाजवळ ‘बाल्ड ईगल’चे घरटे आहे.

मिस्टर बीस्टने सांगितले की, ‘मला माहीत नव्हते की अमेरिकेत बाल्ड ईगल हा संरक्षित पक्षी आहे आणि त्याच्या घरट्याभोवती मोठा आवाज करणे हा फेडरल गुन्हा आहे.’ त्याने गमतीने म्हटले की, ‘आम्हाला वाटले घरटे दुसरीकडे हलवू, पण आम्हाला तातडीने सांगण्यात आले की असे करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे शूट थांबवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही.’ या एका पक्ष्यामुळे संपूर्ण टीमला सामान गुंडाळावे लागले आणि शूट रद्द करून दुसर्‍या तलावावर शिफ्ट व्हावे लागले. या संपूर्ण प्रक्रियेत मिस्टर बीस्टला प्रचंड आर्थिक फटका बसला.

आता कोणताही मोठा शूट सुरू करण्यापूर्वी त्या भागाची संपूर्ण कायदेशीर आणि पर्यावरणीय तपासणी केली जाते, असेही त्याने नमूद केले. या शोमध्ये मिस्टर बीस्टने केवळ नुकसानीची गोष्टच सांगितली नाही, तर प्रेक्षकांना खूशही केले. शोमधील ‘बॉक्स ऑफ लाईज’ या सेगमेंटदरम्यान त्याने जाहीर केले की, जर ब्लफ पकडला गेला तर स्टुडिओमधील प्रत्येक प्रेक्षकाला 1 हजार डॉलर्स दिले जातील. तिसर्‍या राऊंडमध्ये त्याने आपले वचन पाळत स्टुडिओमधील सर्वांना रोख बक्षीस दिले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जून 2025 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, मिस्टर बीस्ट हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा यूट्यूबर आहे. त्याने एका वर्षात सुमारे 85 दशलक्ष डॉलर्स (जवळपास 705 कोटी रुपये) कमावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT