कंबोडिया : कंबोडियाच्या वायव्य भागातील बत्तांबांग प्रांतातील विस्तीर्ण चुनखडीच्या गुहा संशोधकांसाठी नव्या आश्चर्यांचा खजिना ठरत आहेत. हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या गुहांमध्ये अद्याप अनोळखी असंख्य जीवसृष्टी दडलेली आहे. अलीकडील सर्वेक्षणात शास्त्रज्ञांनी अनेक नव्या प्रजाती शोधून काढल्या असून, त्यात निळसर-हिरव्या रंगाचा पिट वायपर साप, उडणारा साप, विविध गेक्को सरडे, सूक्ष्म गोगलगायी आणि मिलिपीडस् यांचा समावेश आहे.
फौना अँड फ्लोरा या संस्थेने कंबोडियाच्या पर्यावरण मंत्रालयासोबत नोव्हेंबर 2023 ते जुलै 2025 दरम्यान 64 गुहांचा अभ्यास केला. या अभ्यासातून प्रत्येक डोंगर आणि गुहा स्वतंत्र ‘विकास प्रयोगशाळा’ असल्याचे स्पष्ट झाले. येथे आढळणारे जीव त्यांच्या विशिष्ट वातावरणाशी जुळवून घेत वेगवेगळ्या प्रकारे उत्क्रांत होत आहेत. अमेरिकेतील ला सिएरा विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ लि ग्रिस्मर यांनी सांगितले की, “या ठिकाणी निसर्ग एकाच प्रयोगाची पुनरावृत्ती करत आहे; पण प्रत्येकवेळी परिणाम वेगळा दिसतो.” संशोधकांनी डीएनए विश्लेषणाद्वारे या प्रजातींच्या उत्क्रांतीची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
या मोहिमेदरम्यान सुंडा पँगोलिन, ग्रीन पीफाउल आणि लांब शेपटीचे माकड यांसारख्या संकटग्रस्त प्रजातींचीही नोंद झाली. मात्र, या गुहांवर सिमेंटसाठी होणारे खाणकाम, अतिपर्यटन आणि जंगलतोड यांसारख्या धोक्यांचे सावट आहे. संशोधक पाब्लो सीनोव्हास यांच्या मते, “आपण अजून केवळ सुरुवात केली आहे. या परिसंस्थेत अजून कितीतरी प्रजाती सापडण्याची शक्यता आहे.” त्यामुळे या अनमोल जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून विशेष संरक्षित दर्जा देण्याची चर्चा सुरू आहे.