Biodegradable Plastic | ‘पीईटी’पेक्षाही मजबूत बायोडिग्रेडेबल प्लास्टिक  Pudhari File Photo
विश्वसंचार

Biodegradable Plastic | ‘पीईटी’पेक्षाही मजबूत बायोडिग्रेडेबल प्लास्टिक

पुढारी वृत्तसेवा

कोबे, जपान : जपानी संशोधकांच्या एका संघाने बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा एक नवीन पर्याय तयार केला आहे, जो पीईटी प्लास्टिकपेक्षाही मजबूत आहे. त्यांनी ई. कोली जीवाणूंचा वापर करून पीडीसीए नावाचे एक संयुग (कंपाऊंड) तयार केले. ही पद्धत विषारी उप-उत्पादने टाळते आणि विक्रमी उत्पादन पातळी गाठते, ज्यामुळे बायोइंजिनिअरिंगच्या क्षेत्रात क्रांती घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पर्यावरणाची समस्या आणि उपाय

प्लास्टिकचा टिकाऊपणा हेच त्याच्या लोकप्रियतेचे कारण आहे; पण याच कारणामुळे पर्यावरणासाठी ते एक मोठी समस्या बनले आहे. जगातील बहुतेक प्लास्टिक पेट्रोलियमपासून बनवले जातात, जे नूतनीकरणक्षम नाहीत. म्हणूनच, जगभरातील वैज्ञानिक बायोडिग्रेडेबल आणि बायो-सोर्स्ड प्लास्टिक पर्याय शोधत आहेत. मात्र, उत्पादन खर्च आणि शुद्धतेच्या समस्यांमुळे त्यात अनेक अडथळे येतात.

कोबे विद्यापीठातील बायोइंजिनिअर त्सुतोमु तनाका म्हणतात, बहुतेक बायोमास-आधारित उत्पादन कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनने बनलेल्या रेणूंवर लक्ष केंद्रित करतात. पण पीडीसीए सारखी संयुगे ज्यात नायट्रोजनसारखे इतर घटक असतात, ते उच्च-कार्यक्षमतेच्या प्लास्टिकसाठी खूप आशादायक आहेत.

ई. कोलीचा वापर

डॉ. तनाका आणि त्यांच्या टीमने ई. कोली जीवाणूंना खास प्रकारे तयार केले, जे ग्लुकोजपासून थेट पीडीसीएचे उत्पादन करू शकतील. त्यांनी ‘मेटाबोलिक इंजिनिअरिंग’ जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या संशोधनात सांगितले की, त्यांनी बायोरिक्टरमध्ये पीडीसीएचे उत्पादन आधीच्या तुलनेत सात पटींनी अधिक केले. या प्रक्रियेत कोणतेही अवांछित उप-उत्पादने तयार झाली नाहीत, ज्यामुळे ही पद्धत अधिक कार्यक्षम ठरली.

या प्रक्रियेत त्यांना असे आढळले की, यात वापरल्या जाणार्‍या एका एन्झाइममुळे हायड्रोजन पेरॉक्साइड (एच2 ओ2) नावाचे एक अत्यंत प्रतिक्रियाशील संयुग तयार होते. यामुळे एन्झाइम निष्क्रिय होत होते. त्यांनी कल्चरच्या परिस्थितीत बदल करून आणि एच2 ओ2 नष्ट करणारा पदार्थ जोडून ही समस्या सोडवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT