World’s Largest Shopping Mall | जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल 
विश्वसंचार

World’s Largest Shopping Mall | जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल

जणू संपूर्ण शहरच वसलेय आत : आईस रिंकपासून गोल्फ कोर्सपर्यंत ‘सब कुछ’!

पुढारी वृत्तसेवा

सेऊलः दक्षिण कोरियातील ‘शिनसेगा सेंटम सिटी’ आकाराच्या बाबतीत एखाद्या छोट्या शहरापेक्षा कमी नाही. बुसानच्या ‘सेंटम सिटी’ परिसरात बनलेला हा एक विशाल शॉपिंग आणि एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌नुसार, हे जगातील सर्वात मोठे डिपार्टमेंटल स्टोअर आहे. याचे एकूण फ्लोअर एरिया सुमारे ३१ लाख ६३ हजार स्क्वेअर फीट (सुमारे २.९४ लाख स्क्वेअर मीटर) आहे.

२००९ मध्ये सुरू झालेला हा कॉम्प्लेक्स केवळ दक्षिण कोरियातच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. इथे येणारी व्यक्ती फक्त खरेदी करून परत जात नाही, तर एकाच छताखाली अनेक अनोखे अनुभव घेते. शिनसेगा सेंटम सिटीची इमारत १६ मजल्यांवर पसरलेली आहे. इथे ७०० हून अधिक वेगवेगळे स्टोअर्स आहेत, जिथे फॅशन, कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, घरातील सामान आणि लक्झरी ब्रँडस्‌ मिळतात. खरेदीच्या सोयीसोबतच लोकांनी इथे दीर्घकाळ थांबून इतर अ‍ॅक्टिव्हिटीजचा आनंद घ्यावा, अशा पद्धतीने मॉलचे डिझाईन करण्यात आले आहे.

या मॉलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘स्पा लँड’. हे केवळ साधे स्पा नसून पारंपरिक कोरियन ‘जिमजिलबांग’ संस्कृतीचे आधुनिक रूप आहे. दिवसभर शॉपिंग करून थकल्यानंतर मॉलबाहेर न जाता याच कॉम्प्लेक्समध्ये आराम करता येतो. इथे वेगवेगळ्या तापमानाचे २२ हॉट पूल आणि १३ प्रकारच्या स्टीम रूम्स आहेत. स्पा लँडमध्ये येणाऱ्यांमध्ये ५० टक्के स्थानिक आणि ५० टक्के परदेशी पर्यटक असतात. पर्यटकांसाठी शाम्पू आणि बॉडी क्लिन्झर मोफत दिले जातात, तर फेस वॉशसाठी वेंडिंग मशिन्स आहेत. ग्राहकांना रिस्टबँडसोबत दोन टॉवेल, शॉर्टस्‌ आणि टी-शर्ट दिले जातात. त्यामुळे शॉपिंगनंतर थेट स्पामध्ये जाऊन रिलॅक्स होता येते.

मॉलमध्ये केवळ शॉपिंग आणि स्पा नाही, तर मनोरंजनाचे मोठे साम्राज्य आहे : कलाप्रेमींसाठी विशेष आर्ट गॅलरी, उन्हाळ्यातही बर्फावर स्केटिंगचा आनंद घेता येणारा भव्य आईस रिंक, गोल्फच्या शौकिनांसाठी ६०-टी गोल्फ ड्रायव्हिंग रेंज, अत्याधुनिक चित्रपटगृह आणि लहान मुलांसाठी खास ‘थीम पार्क’ इथे आहे. कुटुंब आणि मुलांसाठी इथे खास व्यवस्था करण्यात आली आहे. मॉलमध्ये डायनासोर आणि समुद्री चाच्यांच्या थीमवर आधारित एक पब्लिक पार्क उभारण्यात आले आहे. त्यामुळे आई-वडील शॉपिंग करत असताना मुलेही या अनोख्या पार्कमध्ये रमून जातात. या स्टोअरने सलग दोन वर्षे २ ट्रिलियन वोन (सुमारे १.३८ अब्ज डॉलर) पेक्षा जास्त वार्षिक उलाढाल नोंदवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT