वॉशिंग्टनः ईशान्य पॅसिफिक महासागराच्या अथांग खोलीत एका अत्यंत दुर्मीळ आणि विचित्र दिसणाऱ्या ‘बिगफिन स्क्विड’ (Bigfin Squid - Magnapinna) चे पहिल्यांदाच कॅमेऱ्यात चित्रिकरण करण्यात आले आहे. कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळ समुद्राखालील पर्वतांचे संशोधन करत असताना संशोधकांना १०,००० फूट (सुमारे ३,००० मीटर) पेक्षा जास्त खोलीवर हा जीव आढळून आला.
‘मॉन्टेरी बे ॲक्वेरियम रिसर्च इन्स्टिट्यूट’ (MBARI) आणि ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ (NOAA) च्या शास्त्रज्ञांनी ७ ऑगस्ट रोजी ही ऐतिहासिक शोधनोंद केली. ईशान्य पॅसिफिक महासागरात बिगफिन स्क्विड जिवंत अवस्थेत दिसण्याची ही पहिलीच अधिकृत वेळ आहे. MBARI मधील सागरी परिसंस्थाशास्त्रज्ञ ओलिव्हिया सोआरेस परेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्क्विड समुद्रतळावर पोहत असताना त्याचे हात आणि स्पर्शक (Tentacles) ९० अंशाच्या कोनात वळलेले होते.
संशोधकांनी या स्थितीला ‘एल्बो पोझ’ (कोपराच्या आकाराची स्थिती) असे नाव दिले आहे. परेरा म्हणाल्या, ‘इतर खोल समुद्रातील स्क्विडच्या वर्तनानुसार, ही स्थिती त्यांच्या शिकारीच्या तंत्राचा भाग असू शकते. स्पर्शक एकमेकांत अडकू नयेत आणि पकडलेली शिकार सहज चिकटून राहावी, यासाठी ते अशा प्रकारे हात पसरवतात.’ बिगफिन स्क्विड हे समुद्रात सर्वात जास्त खोलीवर राहणारे स्क्विड मानले जातात. हे जीव पृष्ठभागापासून २०,००० फूट (६,००० मीटर) पेक्षा जास्त खोलीवर आढळू शकतात. या प्राण्यांची एकूण लांबी प्रामुख्याने त्यांच्या हातांवर आणि स्पर्शकांवर अवलंबून असते, जे त्यांच्या मुख्य शरीरापेक्षा २० पट लांब असू शकतात.
व्हिडीओमध्ये दिसलेला स्क्विड शरीरासह आणि स्पर्शकांसह सुमारे ४.१ फूट (१.२५ मीटर) लांब होता. जगात आतापर्यंत अशा केवळ ७० स्क्विडच्या नोंदी झाल्या आहेत. MBARI च्या संशोधकांनी यापूर्वी २००१ मध्ये हवाई किनारपट्टीजवळ बिगफिन स्क्विड पाहिला होता. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर ३ ते १२ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात आलेल्या १० दिवसांच्या ‘सीमाऊंट हॉटस्पॉटस्’ मोहिमेदरम्यान ‘Doc Ricketts’ या मानवरहित पाणबुडीच्या मदतीने मॉन्टेरीच्या नैर्ऋत्येला सुमारे १३० किलोमीटर अंतरावर १०,७५१ फूट खोलीवर हा स्क्विड पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाला.