Fake content on Instagram Pudhari
विश्वसंचार

Fake content on Instagram: सावधान! इन्स्टाग्रामवर फेक कंटेंटचा सुळसुळाट

एआयमुळे होणार अस्सल ओळखणे कठीण : कंटेंट क्रिएटर्ससाठी विश्वास ठरणार महत्त्वाचा

पुढारी वृत्तसेवा

सॅन फ्रान्सिस्को : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे सोशल मीडियाचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असून, इन्स्टाग्रामवर येणारा आशय (कंटेंट) येत्या काळात मोठ्या प्रमाणात फेक किंवा बनावट असू शकतो. या संदर्भात इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी इशारा दिला आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने शेअर केलेल्या एका विशेष पोस्टमध्ये त्यांनी एआयमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला.

मोसेरी यांच्या मते, एआय आता इतके प्रगत झाले आहे की, ते हुबेहूब मानवी वाटणारा आणि अथेंटिक भासणारा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ तयार करू शकते. यामुळे एखादी गोष्ट खरी आहे की एआयने बनवलेली, हे ओळखणे कठीण होणार आहे. आतापर्यंत आपण फोटो किंवा व्हिडीओ पाहून तो खरा आहे असे मानत होतो; पण आता तसे राहिलेले नाही. हे बदल स्वीकारण्यासाठी आपल्याला वर्षे लागतील, असे मोसेरी यांनी स्पष्ट केले.

कंटेंट क्रिएटर्ससाठी विश्वास महत्त्वाचा

भविष्यात काय सांगितले जात आहे, यापेक्षा ते कोण सांगत आहे याला जास्त महत्त्व प्राप्त होईल. क्रिएटर्ससाठी मोसेरी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. बनावट कंटेंटच्या गर्दीत अस्सलपणा ही सर्वात मौल्यवान गोष्ट ठरेल. तुम्ही काय बनवू शकता? यापेक्षा असे काय आहे जे फक्त तुम्हीच बनवू शकता? यावर क्रिएटर्सचे यश अवलंबून असेल. फॉलोअर्सचा विश्वास टिकवून ठेवणे हीच क्रिएटर्सची मोठी ताकद ठरेल.

भविष्यातील उपाययोजना

मोसेरी यांनी सुचवले आहे की, भविष्यात कॅमेरा उत्पादक कंपन्या फोटो काढतानाच त्यावर डिजिटल स्वाक्षरी करतील, जेणेकरून तो फोटो मूळ आहे की नाही हे समजू शकेल. केवळ एआय लेबल लावणे पुरेसे नसून, तो कंटेंट शेअर करणाऱ्या अकाऊंटची पार्श्वभूमी काय आहे, हे यूजर्सना समजणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT