आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींचा आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. हॅाटेलमध्ये सोडा टाकलेले पदार्थ खाणे त्याचबरोबर भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने अनेक वेगवेगळे त्रास होतात. आजकालची युवा पिढी स्ट्रिटवर मिळणार पदार्थ खाणे पसंत करते; पण त्यामुळे आजारांनादेखील लवकर माणूस बळी पडतो. सातत्याने हॉटेल किंवा स्ट्रिटवर मिळणारे पदार्थ खाल्ले तर गॅस, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या त्रासदायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत, आपल्या आहारात फायबरयुक्त संपूर्ण धान्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. फायबरयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश केला, तर ते पचनसंस्थेला उत्तम प्रकारे कार्य करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायक धान्यांची ही माहिती...
ओटस् : निरोगी नाश्त्यासाठी ओटस् हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये फायबर, विशेषतः बीटा-ग्लुकन असते, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते. हे फायबर शौचातील आणि आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचे पोषण करण्यास मदत करते. नाश्त्यामध्ये ओटस् दूध, दही किंवा फळांसोबत खाल्ले जाऊ शकतात.
ज्वारी : ज्वारी हे फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेले एक पौष्टिक संपूर्ण धान्य आहे. त्याचे सेवन केल्याने तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊ शकते. ज्वारीमधील फायबर बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करू शकते.
बार्नयार्ड मिलेट : सामा तांदूळ, ज्याला बार्नयार्ड मिलेट असेही म्हणतात. हा फायबरने समृद्ध असलेला एक पौष्टिक पर्याय आहे. संतुलित आहारात याचा समावेश केल्याने तुमच्या रोजच्या फायबरचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते.
नाचणी : नाचणी हे पोषक तत्त्वांनी समृद्ध धान्य मानले जाते. त्यात फायबर, कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे असतात. नाचणीची रोटी, डोसा, लापशी किंवा धिरडे या स्वरूपात ती खाल्ली जाऊ शकते.
राजगिरा : राजगिरा फायबर, प्रथिने आणि अनेक आवश्यक खनिजांनी समृद्ध आहे. याचा आहारात समावेश केल्याने फायबरचे प्रमाण वाढू शकते, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.