Shocking Family Secret | जिवलग मैत्रीण निघाली सख्खी बहीण! 
विश्वसंचार

Shocking Family Secret | जिवलग मैत्रीण निघाली सख्खी बहीण!

डीएनए चाचणीतून झाला खुलासा

पुढारी वृत्तसेवा

ॲमस्टरडॅम : बालपणी भेटलेली मुलगी जी नंतर आपली जीवलग मैत्रीण झाली, तिचं सत्य समजल्यानंतर एका तरुणीला आश्चर्याचा धक्काच बसला. हा आश्चर्याचा धक्का दुसऱ्या बाजूलाही होता, कारण या दोन्ही तरुणींना तब्बल तीन दशकांनंतर सत्य समजलं होतं. डीएनए चाचणी केली असता एक अशी माहिती त्यांना मिळाली, जी मागील ३० वर्षांपासून त्यांना माहिती नव्हती. यानंतर दोघींचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण यातून या दोघी सख्ख्या बहिणी असल्याचं उघड झालं होतं!

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मीना गेल्टिंक आणि मिनल तिसेन या दोघींनाही सुमारे ४० वर्षांपूर्वी भारतातील एका अनाथाश्रमात सोडण्यात आलं होतं. नेदरलँड्समधील वेगवेगळ्या कुटुंबांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. एकाच देशात सुमारे १०० मैल (१६० किमी) अंतरावर त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण आपल्या जवळच आपली बहीण राहत आहे याची दोघींना पुसटशीही कल्पनाही नव्हती. वृत्तानुसार, या दोघींची पहिली भेट १९९६ मध्ये दत्तक घेतलेल्या मुलांसाठी आयोजित एका कार्यक्रमात झाली होती. त्यांना तेव्हाच एकमेकींशी एक विशेष जवळीक जाणवली आणि त्या दिसायला किती सारख्या आहेत, हे त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्याही लक्षात आले.

त्यांनी एकमेकींचे पत्ते घेतले आणि काही काळ संपर्कात राहिल्या. इतकंच काय, तर त्या गंमतीने एकमेकींना ‘sis’ म्हणजेच बहीण म्हणूनही हाक मारत असत, पण नंतर त्यांचा एकमेकींशी संपर्क तुटला. सुमारे १५ वर्षे त्या एकमेकींपासून दुरावल्या. सध्या ४४ वर्षांच्या असलेल्या आणि फ्रान्समध्ये आपल्या जोडीदारासोबत व दोन मुलांसह राहणाऱ्या मीनलला, एप्रिल महिन्यात घरी बसल्या-बसल्या ‘मायहेरिटेज’ डीएनए चाचणीचा निकाल मिळाला. ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार, या चाचणीत मीना ही तिची सख्खी बहीण असल्याचं १०० टक्के निश्चित झालं. हे पाहून तिला मोठा धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटलं. सुरुवातीला मीनलच्या हे लक्षात आले नाही की, ही तीच मुलगी आहे जिची भेट ती किशोरवयीन असताना झाली होती. ‘‘माझा यावर विश्वासच बसत नव्हता,’’ असं ती म्हणाली. अखेरीस तिने सोशल मीडियावर मीनाला शोधून काढले आणि जुन्या फोटोंवरून तिला ओळखलं.

दोघीही एका चांगल्या आणि प्रेमळ दत्तक कुटुंबांमध्ये वाढल्या असल्या, तरी आपल्या मूळ ओळखीबाबत त्यांच्या मनात काही प्रश्न आणि काहीतरी अपूर्ण असल्याची भावना होती. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर जेव्हा त्या नेदरलँड्समध्ये एकमेकींना भेटल्या, तेव्हा दोन्ही बहिणींनी एकमेकीला घट्ट मिठी मारली. त्या मनमोकळेपणाने हसल्या आणि भावुक होऊन रडल्याही. तसेच, बहिणी म्हणून त्यांनी आपला पहिला ‘सेल्फी’ही काढला. ‘‘जेव्हा मी तुला पाहते, तेव्हा मला अगदी घरी असल्यासारखे वाटते. अनेक वर्षे माझ्या मनात एक पोकळी होती. जणू काही कोडे सोडवतानाचा एखादा हरवलेला तुकडा सापडला आहे, असे मला वाटते,’’ असे मीना म्हणाली. ‘‘बहिणी म्हणून ओळख होण्याआधी आम्ही मैत्रिणी होतो. आम्ही तशा सुरुवातीपासूनच बहिणी होतो; पण आम्हालाच त्याची कल्पना नव्हती,’’ मीनलने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT