लंडन : अटलांटिक महासागरातील एक रहस्यमयी जागा, जिथे शेकडो विमानं आणि जहाजं कोणतीही खूण न ठेवता गायब झाली आहेत. या जागेला जग ‘बर्मुडा ट्रँगल’ नावाने ओळखते. गेल्या अनेक दशकांपासून हे ठिकाण एक न उलगडलेले कोडे बनले आहे. एकीकडे यामागे परग्रहावरील जीवांचा (एलियन्स) हात असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे विज्ञान यामागे नैसर्गिक कारणे असल्याचे सांगते.
अनेक सिद्धांतकारांच्या मते, बर्मुडा ट्रँगल हे दुसरे-तिसरे काही नसून एलियन्सचा एक गुप्त तळ आहे, जिथून ते पृथ्वीवर नजर ठेवतात. या दाव्यांना काही ऐतिहासिक घटनांचा आधार दिला जातो. 1492 मध्ये अमेरिकेच्या शोधासाठी निघालेल्या ख्रिस्तोफर कोलंबसने आपल्या रोजनिशीमध्ये एका विचित्र घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, प्रवासादरम्यान त्यांना आकाशात एक चमत्कारी प्रकाश दिसला, जो थेट समुद्रात जाऊन पडला. या घटनेनंतर त्यांच्या जहाजाचे दिशादर्शक यंत्र (कंपास) अचानक काम करेनासे झाले. सिद्धांतकारांच्या मते, हा प्रकाश म्हणजे एलियन्सचे यान होते. 2009 मध्ये बर्मुडा ट्रँगलजवळून जाणार्या एका विमानातील प्रवाशांनी आकाशात एका विचित्र भोवर्यासारखा (व्होर्टेक) प्रकाश पाहिल्याचा दावा केला होता. तो प्रकाश पाहून असे वाटत होते, जणू काही दुसर्या मितीत (टू डायमेन्शन) जाण्याचा तो एक मार्ग असावा.
एकीकडे एलियन्सच्या कथा रोमांचक वाटत असल्या, तरी विज्ञान या घटनांकडे वेगळ्या द़ृष्टिकोनातून पाहते. वैज्ञानिकांच्या मते, बर्मुडा ट्रँगलमध्ये कोणत्याही प्रकारची अलौकिक शक्ती नाही, तर या घटनांमागे पूर्णपणे नैसर्गिक कारणे आहेत. हा परिसर पृथ्वीच्या अशा भागात येतो, जिथे चुंबकीय क्षेत्रात तीव्र बदल होतात. यामुळे जहाजे आणि विमानांची दिशादर्शक यंत्रे अचानक बिघडतात. या भागात हवामान अत्यंत वेगाने बदलते. येथे ताशी 250 किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहू शकतात आणि समुद्राच्या लाटा तब्बल 50 फुटांपर्यंत उंच उसळतात. अशा भीषण वादळात कोणतीही नौका किंवा विमान सहज गायब होऊ शकते. एकीकडे एलियन्स आणि दुसर्या मितीचे सिद्धांत ऐकायला रोमांचक वाटत असले, तरी वैज्ञानिक पुरावे या घटनांमागे तीव्र हवामान आणि भू-चुंबकीय विसंगती असल्याचे सांगतात. तरीही, जोपर्यंत प्रत्येक प्रश्नाचे ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत बर्मुडा ट्रँगलचे हे गूढ कायम राहील.