वॉशिंग्टन : आपल्या सूर्यमालेतील दोन प्रसिद्ध लघुग्रह, बेन्नू आणि रियुगू, हे अब्जावधी वर्षांपूर्वी फुटलेल्या एकाच महाकाय लघुग्रहाचे तुकडे असू शकतात, असा नवीन आणि महत्त्वपूर्ण खुलासा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या डेटामधून समोर आला आहे. जर हे खरे ठरले, तर या दोन ‘भावंडां’मुळे लघुग्रहांचे कुटुंब कसे तयार होते आणि संपूर्ण सूर्यमालेत कसे पसरते, यावर नवीन प्रकाश पडू शकतो.
खगोलशास्त्रज्ञांसाठी बेन्नू आणि रियुगू हे दोन्ही लघुग्रह नेहमीच कुतूहलाचा विषय राहिले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही लघुग्रहांवरून नमुने यशस्वीरीत्या पृथ्वीवर आणण्यात आले आहेत. ‘नासा’च्या ‘ओसायरीस-रेक्स’ यानाने बेन्नूवरून, तर जपानच्या ‘हायाबुसा-2’ यानाने रियुगूवरून नमुने आणले आहेत. या नमुन्यांच्या अभ्यासातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतानाच, जेम्स वेब दुर्बिणीने या रहस्यात आणखी भर टाकली आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, हे दोन्ही लघुग्रह ‘पोलाना’ नावाच्या लघुग्रह कुटुंबातील सदस्य असू शकतात. हे कुटुंब सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात एका मोठ्या लघुग्रहाच्या टक्करीनंतर तयार झाले असावे, असा अंदाज आहे. हे दोन्ही लघुग्रह त्यांच्या विशिष्ट आकारामुळे आणि पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे ‘संभाव्य धोकादायक’ म्हणून ओळखले जातात. बेन्नू : हा लघुग्रह सुमारे 500 मीटर (1,650 फूट) रुंद आहे. ‘नासा’च्या OSIRIS-REx मोहिमेने 2022 मध्ये यावर उतरून नमुने गोळा केले, जे सप्टेंबर 2023 मध्ये पृथ्वीवर पोहोचले. याचा आकार फिरणार्या भोवर्यासारखा आहे.
पुढील शतकभरात याचा पृथ्वीला धोका नसला, तरी 2182 साली याची पृथ्वीशी टक्कर होण्याची धूसर शक्यता ‘नासा’ने वर्तवली आहे, ज्यामुळे त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रियुगू : हा बेन्नूपेक्षा मोठा असून, याची रुंदी सुमारे 900 मीटर (2,950 फूट) आहे. जपानच्या करूरर्लीीर 2 यानाने 2019 मध्ये याला भेट दिली आणि डिसेंबर 2020 मध्ये याचे नमुने पृथ्वीवर आणले. याचा आकारही बेन्नूप्रमाणेच फिरणार्या भोवर्यासारखा आहे. ‘द प्लॅनेटरी सायन्स जर्नल’मध्ये 18 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, संशोधकांनी जेम्स वेब दुर्बिणीने गोळा केलेल्या डेटाची तुलना पृथ्वीवर आणलेल्या नमुन्यांशी केली.