केवळ उदरभरण करण्यासाठी किंवा चवीसाठी खाऊ नये, तर आरोग्याचा विचार करून पौष्टिक आहार घ्यावा, हे जसे गरजेचे आहे तसेच जेवणावर आडवा हात मारून लगेचच आडवे होऊ नये, हेही समजून घेणे गरजेचे ठरते. अनेकांना जेवल्यानंतर बसून राहण्याची किंवा पहुडण्याची सवय असते. त्याचे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जेवल्यानंतर अचानक कोणतेही काम करणे किंवा झोपणे टाळले तसेच जेवल्यानंतर फेरफटका मारण्याची सवय लावल्यास उत्तम. भोजनोत्तर शतपावली करण्याची आपल्याकडे जुन्या काळापासूनच पद्धत आहे. ही पद्धत आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरते. जेवणानंतरच्या अशा शतपावलीचे हे काही लाभ...
रक्तातील साखर नियंत्रित राहते : यासंदर्भात अभ्यासात असे म्हटले आहे की, जर जेवल्यानंतर थोडा फेरफटका मारला, तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यासाठी भोजनानंतर किमान 5 मिनिटे चालणे आवश्यक आहे, असे करणे खूप फायदेशीर मानले जाते.
पचनसंस्था उत्तम राहते : खाल्ल्यानंतर फेरफटका मारण्याची सवय असेल, तर ते पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकते. चालणे पोट आणि आतडे उत्तेजित करते, जे अन्न पचनमार्गातून अधिक जलद हलवण्यास मदत करते.
वजन नियंत्रित राहते : जर तुमचे वजन वाढले असेल, तर तुम्ही वाढलेले वजन व्यवस्थापित करा, यामुळे तुमच्या शरीरातील लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. 1 पौंड कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला दररोज 3,500 कॅलरीज, म्हणजेच 500 कॅलरीज बर्न कराव्या लागतील. खाल्ल्यानंतर थोडे चालणे चयापचय वाढवू शकते.
मूड सुधारतो : जेवणानंतर चालण्याचा व्यायाम केल्यास मूड सुधारतो. अशा हलक्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोलसारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी होण्यास मदत होते. हे एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिनदेखील वाढवते, ज्याला लव्ह हार्मोनदेखील म्हणतात. या चालण्याच्या व्यायामाने तुमची झोपेची समस्याही दूर होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.