नवी दिल्ली : तुम्ही इंग्रजीत एक म्हण ऐकली असेलच "Early to bed, early to rise, makes a man healthy, wealthy and wise'. याचा अर्थ असा की, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही व्यक्ती निरोगी, श्रीमंत आणि बुद्धिमान बनते. म्हणूनच घरातील वडीलधारी मंडळीदेखील आपल्याला सकाळी लवकर उठण्यास सांगतात. आपल्याकडेही ‘लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे’ अशी म्हण आहेच! आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी लवकर उठणे ही एक चांगली सवय आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते.
तज्ज्ञांच्या मते, जे लोक सकाळी लवकर उठून व्यायाम करतात त्यांना हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. कारण, लवकर उठून व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. सकाळी लवकर उठल्याने व्यायाम करण्यासाठी आणि पौष्टिक नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. नियमित व्यायाम आणि निरोगी अन्न हे वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे.
सकाळी लवकर उठणे मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील फायदेशीर आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सकाळी लवकर उठल्याने चयापचय गतिमान होते आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित होते. सकाळी उठून हलका व्यायाम किंवा चालणे केल्याने शरीर इन्सुलिनचा वापर चांगल्या प्रकारे करते. सकाळी लवकर उठल्याने पचनसंस्थादेखील चांगली राहते. सकाळी लवकर उठल्याने ताणतणाव आणि नैराश्यापासूनही आराम मिळतो. दिवसभराचा ताणतणाव आणि नैराश्यासारख्या गंभीर समस्यादेखील सकाळी लवकर उठण्याच्या सवयीने बरे होऊ शकतात. सूर्याच्या पहिल्या किरणामुळे शरीरात सेरोटोनिन आणि डोपामाईनसारखे आनंदी हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे मूड चांगला राहतो.