Sleep schedule benefits | रोज ठरावीक वेळीच झोपण्याचे-उठण्याचे फायदे 
विश्वसंचार

Sleep schedule benefits | रोज ठरावीक वेळीच झोपण्याचे-उठण्याचे फायदे

पुढारी वृत्तसेवा

दिवसभर ऑफिसचे काम आटोपून घरी आल्यावर किंवा जेवण झाल्यावर अनेकजण विरंगुळा म्हणून 5 मिनिटांसाठी मोबाईल हातात घेतात. मात्र, या 5 मिनिटांचे रूपांतर कधी तासाभरात होते आणि कधी रात्रीचे 12-1 वाजतात, हे समजतही नाही. सतत रील्स पाहण्याच्या नादात झोप पूर्ण होत नाही आणि त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. मात्र, आता तज्ज्ञांनी दररोज एकाच निश्चित वेळी झोपण्याचे आणि उठण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

निश्चित वेळी झोपल्यास शरीरात काय बदल होतात?

झोपेचा दर्जा सुधारतो :

दररोज एकाच विशिष्ट वेळी झोपल्यामुळे आणि उठल्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते. यामुळे रात्री वारंवार जाग येण्याची समस्या कमी होते. व्यवस्थित झोप झाल्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटते. याउलट, झोप पूर्ण न झाल्यास मेंदूमध्ये गोंधळ वाढतो आणि थकवा कायम राहतो.

मेंदू अधिक सक्रिय होतो :

नियमित वेळेत झोपण्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण ठरावीक वेळी झोपतो, तेव्हा मेंदूला कधी विश्रांती घ्यायची आणि कधी सक्रिय व्हायचे याचे संकेत मिळतात.

मूड आणि मानसिक आरोग्य :

वेळेवर झोप घेतल्यामुळे ताणतणाव आणि चिंता कमी होते. योग्य ‘स्लीप पॅटर्न’मुळे मेंदूतील ‘फिल गुड’ हार्मोन्स संतुलित राहतात, ज्यामुळे तुमचा स्वभाव आनंदी राहतो.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते :

झोपेत असताना शरीर स्वतःची दुरुस्ती करत असते. दररोज पुरेशी आणि वेळेवर झोप घेतल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे आजारांशी लढणे सोपे जाते.

हृदय आणि हार्मोन्सचे आरोग्य :

नियमित वेळेत झोपल्यामुळे रक्तदाब आणि हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. झोपेच्या अनियमित वेळांमुळे हृदयविकार आणि मेटाबॉलिक डिसऑर्डरचा धोका वाढू शकतो.

असा बनवा योग्य दिनक्रम :

निश्चित वेळ ठरवा : दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.

वीकेंडलाही शिस्त पाळा : सुट्टी आहे म्हणून रात्रभर मोबाईल पाहण्याची चूक करू नका. सुट्टीच्या दिवशीही झोपण्याचे वेळापत्रक बदलू नका.

स्क्रीनपासून दूर राहा : झोपण्यापूर्वी किमान अर्धा ते एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीपासून दूर राहा. मोबाईलच्या अतिवापरामुळेच झोपेच्या निम्म्या तक्रारी उद्भवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT